दिल्लीत भाजपाने ४८ जागी विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. दरम्यान २७ फेब्रुवारीपर्यंत विशेष अधिवेशन असणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान आप म्हणजेच आम आदमी पार्टीच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. ज्यानंतर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं आहे. ज्या १२ आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं त्यात विरोधी पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांचाही समावेश आहे.
नेमकं विधानसभेत काय घडलं?
दिल्ली विधानसभेत गदारोळ करणाऱ्या जुबेर अहमद, वीरेंद्र सिंह कादियान यांच्यासह विरोधी पक्ष नेत्या आतिशी अशा एकूण १२ आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभेत आज कॅगचा अहवाल समोर येणार आहे. या अहवालात शीशमहलच्या दुरुस्ती आणि देखभाल खर्चाचे तसंच नुतनीकरणाच्या खर्चाचे तपशील आहेत. ज्यावरुन कॅगने आधीच्या सरकारला झापलं आहे. त्यावरुन आपमच्या आमदारांनी हंगामा केला. तसंच दिल्ली विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला. या दोन्ही मुद्द्यांवरुन गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी केला आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची दिल्लीत बैठक
दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाने रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी भाजपाच्या सगळ्या आमदारांची भेट घेतली. दरम्यान कॅगचा अहवाल सादर होण्याआधीच विधानसभेत गदारोळ पाहण्यास मिळाला. ज्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्या आतिशी यांच्यासह एकूण १२ आमदारांचं एक दिवसासाठी निलंबन केलं.
आतिशी यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“भाजपाने त्यांचा खरा चेहरा संपूर्ण देशाला सोमवारी दाखवला. दिल्ली विधानसभा आणि दिल्ली सचिवालय या ठिकाणी असलेल्या मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर कार्यालयांमध्ये असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हटवून त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. भाजपाच्या लोकांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागा घेऊ शकतात त्यामुळेच हे करण्यात आलं.”
आपच्या प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी म्हटलं आहे की कॅगचा अहवाल येणं ही फक्त औपचारिकता आहे. आमच्या सरकार आलं असतं तरीही आज आम्ही हा अहवाल आणलाच असता.