नवी दिल्ली : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी हरियाणातून दिल्लीला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी संपुष्टात आले. मंगळवारी पहाटेपासूनच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांना उपोषण थांबवावे लागले. त्यांना दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> मराठी खासदारांचा उत्साह; सदस्यत्वाची शपथ घेताना सभागृहात विविध घोषणा
दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी आतिशी यांनी चांगले आरोग्य आणि आनंदी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याचवेळी त्यांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल करणे थांबवावे अशी टीकाही केली. लोकनायक रुग्णालयाचे वैद्याकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी आतिशी यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘‘सोमवारी संध्याकाळी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आणि मूत्रामध्ये किटोन आढळून आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आले होते. मात्र, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. मात्र, मध्यरात्रीनंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना चक्कर येऊ लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.’’ दिल्लीमध्ये गंभीर पाणीसंकट निर्माण झाले असून आप सरकारने हरियाणा आणि हिमाचल प्रदेशकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतरही हरियाणा पाणी सोडत नसल्याचा आरोप करत आतिशी यांनी २१ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.