नवी दिल्ली/गाझियाबाद : गाझियाबादमध्ये (उत्तर प्रदेश) दिल्लीच्या एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. मालमत्तेच्या वादातून या ३६ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुरु तेगबहादूर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या पीडितेची प्रकृती स्थिर असून, तिला कोणतीही अंतर्गत गंभीर दुखापत झालेली नाही. तथापि, रुग्णालयातील सूत्रांनी असेही सांगितले की, या महिलेच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराच्या काही खुणा आढळल्या. तिच्या शरीरात एक ‘बाहेरची वस्तू’ (फॉरेन ऑब्जेक्ट) दिसत आहे.

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावली. आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी नोटिशीत म्हटले आहे, की या दुर्दैवी घटनेतून ‘निर्भया’प्रकरणाची आठवण झाली. ही दिल्लीची रहिवासी महिला गोणीत गुंडाळलेली, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गुप्तांगात लोखंडी गज घुसवण्यात आल्याचे समजते.  गाझियाबादचे पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितले, की नंदग्राम पोलिस ठाण्याच्या ‘११२’ या आपत्कालीन मदतसहाय्य क्रमांकावर १८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनला आश्रम रस्त्यावर एक महिला पडलेली असल्याची माहिती देणारा दूरध्वनी आला. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने जाऊन या पीडितेला जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तेथे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला मिळाल्यानंतर पीडितेला जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने सांगितले की, घटनेच्या एक दिवस आधी ती तिच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. पोलीस अधीक्षकांनी ‘ट्विटर’वरील चित्रफितीत सांगितले, की या महिलेच्या भावाने तिला घरी सोडल्यानंतर तिच्या परिचितांपैकी काही जणांनी तिचे अपहरण केले. सुरुवातीच्या जबाबात या महिलेने दोन व्यक्ती असल्याचे सांगितले होते. नंतर मात्र पाच जणांनी तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार करून अत्याचार केल्याचा आरोप तिने केला.  त्या संशयितांपैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. महिला व आरोपींत मालमत्तेवरून वाद असल्याचे प्राथमिक तपासात समजले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Story img Loader