नवरा-बायकोची भांडणं ही काही नवीन नाही. संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणार हे ओघाने आलंच. मात्र अशाच एका भांडणात पत्नीने चक्क पतीच्या कानाचा चावा घेतला आणि त्याचा तुकडा पाडला आहे. या प्रकरणी पतीचा कान चावणाऱ्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतल्या सुलतानपुरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात पतीने लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेलं नाही म्हणून पत्नीने त्याच्या नाकावर ठोसा मारला. हा घाव पतीला इतका वर्मी बसला की त्याचा त्यात मृत्यू झाला. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी असा प्रकार घडल्यानंतर आता ‘क्राईम कॅपिटल’ अशी ओळख झालेल्या दिल्लीतून ही घटना समोर आली आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुससार २० नोव्हेंबरच्या दिवशी पती पत्नीमध्ये भांडण झालं. ज्याचा कान चावला तो माणूस कचरा फेकायला बाहेर गेला होता. बाहेरून आल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर या माणसाची पत्नी त्याला म्हणाली की हे घर विक आणि मला माझा हिस्सा दे. मला माझ्या मुलांसह वेगळं राहायचं आहे. त्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात या माणसाची पत्नी त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या कानाचा कडकडून चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की कानाचा तुकडा पडला. उजव्या कानाचा वरचा भाग खाली पडल्यानंतर या माणसाच्या मुलाने त्याला संजय गांधी रुग्णालयात नेलं आणि त्याच्यावर उपचार केले.
हे पण वाचा- पत्नीने नाकावर ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू, लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संताप; पुण्यातली घटना
सुरुवातीला संजय गांधी रुग्णालयात मला नेण्यात आलं होतं. त्यानंतर रोहिणी भागात असलेल्या जयपूर गोल्डन रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आलं. तिथे माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असं या पीडित माणसाने पोलिसांना सांगितलं. पीडित पुरुषाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम ३२४ च्या अन्वये या माणसाच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी सांगितलं की त्यांना या संपूर्ण प्रकाराची माहिती रुग्णालयाद्वारे मिळाली. त्यानंतर आता पुढील तपास आम्ही करत आहोत. सुरुवातीला ज्या माणसाचा कान चावला गेला तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. नंतर त्याने आपला जबाब नोंदवला असं पोलिसांनी सांगितलं. २२ तारखेला या माणसाने लेखी तक्रार दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.