गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. प्रेम प्रकरणातून हत्येचे प्रकारही वाढले आहेत. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. तरुणाकडून सातत्याने लैंगिक अत्याचार होत असल्याने एका तरुणीने त्याची हत्या केली आहे. त्याचा मृतदेह पोलिसांना सापडल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीसह एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
२० वर्षीय तरुणी दिल्लीत राहते. तिच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर तिच्यावर २० वर्षीय तरुणाकडून सातत्याने लैंगिक अत्याचार केले जात होते. विविध ठिकाणी बोलावून तिच्यावर बलात्कार केला जात होता. या त्रासाला ती कंटाळली होती. त्यामुळे या तरुणाचा बदला घेण्याकरता तिने या तरुणाची हत्या करण्याचे ठरवले.
हेही वाचा >> पाकिस्तानी मुस्लिम महिलेचं भारतीय हिंदू तरुणाशी प्रेमप्रकरण! नक्की काय घडलं?
दरम्यान, गेल्या काही दिवासंपासून यमुना नदी ओसंडून वाहतेय. ही नदी पाहण्यासाठी तरुणीने त्याला बेला फार्म येथे बोलावले. त्याला बेला फार्म येथे बोलावून संबंधित तरुणीने तिच्या एका सहाय्यकाच्या मदतीने त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे तो जागीच मृत झाला. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह फेकून देण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रविवारी सकाळी ८.३४ च्या सुमारास शास्त्री पार्क परिसरातील बेला फार्ममध्ये मानेवर आणि पोटावर जखमेच्या खुणा असलेला शर्टविना मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला तरुणीचा शोध
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर, उत्तर प्रदेशातील बदायुन येथील रहिवासी २० वर्षीय तरुणी आणि शास्त्री पार्कमधील रहिवासी इरफान (३६) अशा दोन संशयितांची ओळख पटली. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले, असे पोलिस उपायुक्त (ईशान्य) जॉय तिर्की यांनी सांगितले.
बदला घ्यायचा म्हणून केली हत्या
चौकशीत महिलेच्या पतीचा जानेवारी महिन्यात मृत्यू झाल्याचे उघड झाले, असेही पोलिसांनी सांगितले. महिलेने पोलिसांना सांगितले की, पतीच्या मृत्यूनंतर संबंधित तरुणाकडून सातत्याने बलात्कार करण्यात येत होता. या त्रासापासून सुटका आणि तरुणाचा बदला घ्यायचा होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली.
महिलेला इरफान या व्यक्तीनेही मदत केली. इरफानची पत्नी आणि महिला दोघीही मैत्रिणी असल्याने इरफानने या प्रकरणात सहभाग घेतला, असं पोलिसांनी सांगितले.