नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेला कानमंत्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना दिला. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून समाजातील प्रत्येकाला त्यातून लाभ मिळेल. ही बाब खासदारांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अदानी प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हल्लाबोल केला असताना ‘लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व केंद्र सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांची व योजनांची माहिती दिली पाहिजे,’ असे आवाहन मोदींनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पुढील वर्षी पूर्ण अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करून ‘निवडणुकीचा अर्थसंकल्प’ मांडण्याची संधी केंद्र सरकारकडे होती; पण २०२३-२४चा अर्थसंकल्प लोकसभेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून मांडल्याचा आरोप कोणीही करू शकणार नाही. या अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले.
तुर्कस्तान व सीरियामध्ये तीव्र भूकंपांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल बोलताना मोदींनी गुजरातमधील भूकंपाचा अनुभव सांगितला. भूकंपामुळे गुजरातचे अतोनात नुकसान झाले. त्यातून बाहेर पडून पुन्हा गुजरातने स्वत:ला घडवले; पण त्यासाठी कित्येक वर्षे कष्ट सोसावे लागले. तुर्कस्तान व सीरियातील नागरिक कुठल्या संकटाला सामोरे जात आहेत, हे समजू शकतो. या देशांना भारताने तातडीने मदत पाठवली आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
सरकारविरोधी भावनेवर संवादाचा उपाय
या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून त्यानंतर लोकसभेची निवडणूक होईल. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याने खासदारांनी लोकांपर्यंत गेले पाहिजे, अधिकाधिक लोकसंवादातून सरकारविरोधातील मतांची तीव्रता कमी होते, असा सल्ला मोदींनी दिला.