Toranto Plane Crash: कॅनडाच्या टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा भयंकर अपघात झाला आहे. हे विमान आधी जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर उलटले. पण, सुदैवाने, या अपघातात विमानातील कोणीही दगावले नाही. पील रीजनल पॅरामेडिक सर्व्हिसेसनुसार, यात एका मुलासह १८ जण जखमी झाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांता वाढलेल्या विमान अपघातांमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जीवितहानी टळण्यामागची कारणे
दरम्यान इतका भयंकर अपघात होऊनही यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तज्ज्ञांच्या मते, अपघातानंतर विमानातील प्रवाशी सुरक्षित राहण्यामागे विशेष अभियांत्रिकी व्यवस्था, विमानाचा आकार आणि सीटबेल्ट यासारख्या घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विमान अपघातांमध्ये ते उलटणे अत्यंत दुर्मिळ आहे. पण, अशाच कठिण परिस्थितीसाठी ते तयार करण्यात आले आहेत, असे फ्लोरिडाच्या एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटीमधील सहयोगी प्राध्यापक आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे कार्यक्रम समन्वयक माइक मॅककॉर्मिक यांनी सांगितले. याबाबत यूएसए टुडेने वृत्त दिले आहे.
“विमानातील सीट्स गुरुत्वाकर्षणाच्या सोळा पट अधिक भार सहन करण्याच्यादृष्टीने डिझाइन केलेले असतात, ज्यामुळे जरी विमान उलटले तरी सीट्स जागीच राहतात. म्हणूनच प्रवाशांना टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान सीट बेल्ट लावण्यास सांगितले जाते”, असे मॅककॉर्मिक यांनी सांगितले आहे.
…हेच एअर हॉस्टेसचे खरे काम
आज विमान उलटण्याचा जो प्रकार घडला, तो कधी उद्भवल्यास प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करण्याची जबाबदारी विमानातील प्रशिक्षित कर्मचारी वर्गावर असते. अशा परिस्थितीत विमानातील प्रवाशी सुरक्षित राहतील यासाठी त्यांना आणीबाणीच्या परिस्थिती कसे निर्णय घ्यायचे याचेही प्रशिक्षण दिले जाते.
“बहुतेक लोकांना वाटते की, विमान परिचारिका फक्त अल्पोपहार आणि प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी असतात. पण, आज जो अपघात घडला तसे प्रकार घडल्यानंतरच त्यांचा अनुभव आणि प्रशिक्षण प्रत्यक्षात कामाला येते आणि हेच त्यांचे खरे काम असते,” असे मॅककॉर्मिक यांनी यूएसए टुडेला सांगितले.
काय आहे प्रकरण?
डेल्टा एअर लाईन्सचे ८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा सोमवारी टोरंटो विमानतळावर अपघात झाला. या अपघातात सुमारे १८ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एंडेव्हर एअरचे ४८१९ हे विमान ७६ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह कॅनडाच्या सर्वात मोठ्या टोरंटो शहरात उतरत होते. या विमानाने अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथून उड्डाण केले होते, असे एअरलाइनने सांगितले. यामध्ये एक लहान मुलगा, ६० वर्षीय पुरुष आणि ४० वर्षीय महिला गंभीर जखमी झाले आहे. किरकोळ दुखापत झालेल्या इतरांना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरने परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पॅरामेडिक सर्व्हिसेसचे लॉरेन्स सँडन यांनी दिली.