छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) : ‘मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे केवळ सोपस्कार नकोत. तर, या विद्यापीठाला पुरेसा निधी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे,’ अशी मागणी करणारा ठराव ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रविवारी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या ठरावांबाबत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाकडून पुस्तकांचे गाव विकसित करण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. पण, हे करताना ग्रंथालयांना अल्प अनुदान आणि ग्रंथपालांना तुटपुंजे वेतन यामुळे झालेल्या ग्रंथालयांच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधणारा ठरावही मांडण्यात येणार आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याबरोबरच भाषेसाठी प्रस्तावित निधी त्वरित मिळावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने सुरू होत असलेल्या मराठी अध्यासनाला केंद्र सरकारने पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ फेब्रुवारी हा बोली भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा, या मागणीसह राज्यात बोली भाषा विकास अकादमी सुरू करण्याची मागणी करणारा ठरावही मांडण्यात येणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीत मराठीचे जतन करणाऱ्या बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अतिरिक्त निधी द्यावा, अशी मागणी करण्याबरोबरच न्यायप्रविष्ट गोष्टींमध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकारने सीमा भागातील मराठी बांधवांना महाराष्ट्रात सहभागी करून घ्यावे, असे साकडे सरकारला घालण्यात आले आहे.
तमाशा आणि वारीचा दस्तऐवज
यंदाच्या संमेलनात संदेश भंडारे यांच्या छायाचित्रांनी साकारलेल्या ‘तमाशा आणि वारी’ या विशेष स्टॉलने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील दोन महत्त्वाचे सांस्कृतिक प्रवाह झ्र पंढरीची वारी आणि तमाशा यांचे अप्रतिम छायाचित्र संकलन येथे प्रदर्शित करण्यात आले आहे.
ग्रंथनगरीत वाचकांची गर्दी
येथील तालकटोरा स्टेडियममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरीतील नामांकित प्रकाशन संस्थांच्या दालनांना साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने भेट दिली. संमेलनादरम्यान देशभरातील विविध नामांकित प्रकाशनाच्या दालनांना साहित्य रसिक भेट देत आहेत. महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यातून आलेल्या साहित्यप्रेमींनी अनेक पुस्तके विकत घेतली. बार्टी, बालभारती, लोकराज्य यासह शासनाच्या विविध दालनांवरही साहित्य रसिकांची गर्दी होती. या नगरीत शंभरहून अधिक दालने आहेत.
आगामी संमेलनासाठी चार निमंत्रणे
दिल्ली येथील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी सूप वाजत असताना आगामी संमेलनासाठी सातारा, चिपळूण, इचलकरंजी आणि औदुंबर अशा चार ठिकाणची निमंत्रणे आली आहेत. संमेलनासाठी निमंत्रण स्वीकारण्याची ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुण्यात स्थलांतरित होत असून, नवे पदाधिकारी आगामी संमेलनाचे स्थळ निश्चित करणार आहेत.