पूर्ती साखर कारखानाप्रकरणी कॅगच्या वादग्रस्त अहवालावरून काँग्रेस सदस्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात राज्यसभा दणाणून सोडली. आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेत सलग दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरण देण्याची वेळ नितीन गडकरी यांच्यावर आली. पूर्ती साखर कारखान्यास दिलेल्या कर्जवसुलीत वित्तीय मानकांचे उल्लंघन झाल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. त्यावरून सलग तीन दिवस राज्यसभेत गदारोळ झाला. कॅगच्या अहवालात भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला नाही. अहवालातील निष्कर्षांवर लोकलेखा समितीत निर्णय होईल. याउपर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या कोणत्याही चौकशीस तयार असून विरोधकांच्या कथित आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास मंत्रिपदाचाच नव्हे, तर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईल, अशी आक्रमक भूमिका गडकरी यांनी घेतली. गडकरी यांच्या पूर्ती उद्योगसमूहास आयआरबी या बांधकाम व्यवसायातील कंपनीने दिलेले कर्ज, पूर्ती उद्योगसमूहात संचालक असलेले वाहनचालक-घरगडी आदी मुद्यावरून काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी गडकरी यांना लक्ष्य केले. आर्थिक डबघाईचे कारण पुढे करणाऱ्या पूर्ती साखर कारखान्याने याच काळात दोन नवे कारखाने कसे काय खरेदी केले, असा प्रश्न रजनी पाटील यांनी गडकरी यांना विचारला.
    गडकरी म्हणाले की, पूर्ती साखर कारखान्यास हरित ऊर्जा प्रकल्पासाठी कर्ज देण्यात आले होते. ऊसाच्या बगासपासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठीच हे कर्ज आयआरईडीएने   मंजूर केले होते. ऊसाचे उत्पादन घटल्याने हा प्रकल्प कोळशापासून सुरू करण्यात आला. त्यामुळे तुम्ही दिलेले कर्ज आम्हाला परत करायचे आहे, अशा आशयाचे पत्र पूर्ती साखर कारखान्याने १४ सप्टेंबर २००९ रोजी आयआरईडीएला पाठविले होते. त्यानंतर एकरकमी कर्ज वसूल करण्याची तयारी आयआरईडीने दर्शवली होती. यात पूर्ती साखर कारखान्याने कोणतीही माहिती दडवलेली नाही. प्रवर्तक व हमीदार असलो तरी पूर्ती साखर कारखान्यास सरकारकडून एक रुपयाचीदेखील सबसिडी मिळालेली नसल्याचा दावा, गडकरी यांनी केला. गडकरी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधकांनादेखील चेव चढला. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यसभेचे कामकाज चारदा तहकूब करावे लागले. ज्यांनी कोळसा घोटाळ्यातून देशाचे कोटय़वधींचे नुकसान केले तेच आज हिशोब मागत असल्याच्या गडकरी यांच्या आरोपामुळे विरोधकांच्या रागाचा भडका उडाला. दोन तासांपेक्षाही हा गोंधळ सुरू होता. अखेरीस काँग्रेस खासदारांच्या आक्रमक पवित्र्यावर ‘तुमच्यामुळे मलाच खजील झाल्यासारखे वाटत आहे’, अशा शब्दात उपसभापती पी.जे. कुरियन यांनी नाराजी व्यक्त केली.

Story img Loader