पीटीआय,नवी दिल्ली
वैद्याकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिबल यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. ही परीक्षा कशी असावी यासाठी सरकारने सर्व राज्यांशी चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सिबल यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. कोणत्याही परीक्षेतील भ्रष्ट प्रकाराबाबत पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
सर्व राजकीय पक्षांनी नीट परीक्षेचे प्रकरण संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडण्याचे आवाहन सिबल यांनी केले. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत सरकार यावरील चर्चेस परवानगी देणार नाही, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. सध्याची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) बुचकळ्यात पडली असून, माध्यमांमध्ये यातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. गुजरातमधील काही प्रकारांनी मला गोंधळात टाकले असून, ही चिंतेची बाब आहे. ‘एनटीए’ने यापैकी काही गंभीर प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>शून्य दहशतवाद, वर्चस्वासाठी नियोजन करा; जम्मूतील धोरणांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सक्त सूचना
आश्चर्याची आणि तेवढीच निराशाजनक बाब म्हणजे जेव्हा जेव्हा असे काही घडते, सरकारच्या अधिपत्याखाली भ्रष्टाचार होतो तेव्हा ‘अंधभक्त’ ‘यूपीए’ सरकारला दोष देतात. परंतु हे सर्वांत दुर्दैवी आहे. असे आरोप करण्यापूर्वी पूर्णपणे शिक्षित असणे आवश्यक असल्याचा टोलाही सिबल यांनी लगावला.
नीट परीक्षा २०१० मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) त्यांच्या संचालक मंडळाद्वारे सादर केली होती. ‘एमसीआय’ हे आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत होते, शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नाही, मनुष्यबळ विकासमंत्री या नात्याने माझे याच्याशी काही देणेघेणे नव्हते, हेदेखील सिबल यांनी निदर्शनास आणून दिले.
‘समाज माध्यमात डोकावून पाहा’
पेपरफुटीचे किंवा परीक्षेतील घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावल्याबद्दल सिब्बल यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही फटकारले. ‘त्यांनी समाज माध्यमात डोकावून पाहून गुजरातमध्येच काय चालले आहे, हे पाहावे. गुजरात हे प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीतही ते काहीसे पुरोगामी असल्याचे दिसते,’ असे टीकास्त्रही त्यांनी भाजपवर सोडले. देशभरात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.