करोनामुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनच्या निर्णय घेतला आहे. काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहे. तर अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. विरोधकांनीही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच ट्विटरवर मोदी इस्तीफा दो हा हॅशटेग ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर मोदी विरोधक आणि समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या कमेंट्स करत आहेत.

अनेक राजकीय नेत्यांनी देखील ‘#मोदीइस्तीफादो….’, या हॅशटॅग्सह ट्विट केले आहे. यापुर्वी #ResignModi हा हॅशटॅग्स ट्रेंड झाला होता. काही तासातच 2 लाखांहून अधिक युजरने नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

 

देशातील करोना स्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी टीकेचे धनी ठरत आहेत. दुसऱ्या करोना लाटेत देशातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. राजस्थान युथ काँग्रेसनंही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच दिल्लीत 22 हजार कोटीचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि 13 हजार कोटीचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम सुरू आहे. यावरून “भारताला निरुपयोगी सेंट्रल व्हिस्टाची नव्हे तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता”, असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 14 हजार 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग 11 व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

Story img Loader