कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. निज्जर हा ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या भारत सरकारने बंदी घातलेल्या संस्थेचा म्होरक्या होता. तसेच तो सरे शहरातील गुरू नानक शीख गुरुद्वाराचा प्रमुख होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या हत्याकांडात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. यानंतर भारत आणि कॅनडामधील परस्पर संबंध ताणले आहेत.

निज्जरच्या हत्येनंतर ८० च्या दशकात धगधगणारी खलिस्तानी चळवळ पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. अलीकडेच कॅनडामधील शीख समुदयाने ‘ऑपरेशन ब्लूस्टार’च्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रॅम्प्टन शहरात रॅली काढली. या रॅलीत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करण्यात आला. त्याबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त करून निषेध नोंदवला. पण ही खलिस्तानी चळवळ नेमकी काय होती? याची सुरुवात कुठून झाली? आणि याचे परिणाम काय भोगावे लागले? याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

हेही वाचा- भारतावर आरोपाचा कट कॅनडातच रचला गेला? निज्जर हत्या प्रकरणात भारतीय उच्चाधिकाऱ्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा तपास…”

खलिस्तानच्या मागणीवरून ८० च्या दशकात पंजाबसह आसपासच्या परिसरात उफाळलेला हिंसाचार, इंदिरा गांधी सरकारने राबवलेलं ‘ऑपरेशन ब्लू स्टार’, त्यानंतर इंदिरा गांधींची झालेली हत्या व दिल्लीतील उसळलेल्या शीखविरोधी दंगली अशी साधारण टाईमलाईन प्रत्येकाला ज्ञात आहे. परंतु त्याची खरी पाळेमुळे ही स्वातंत्र्यपूर्व इतिहासात दडलेली आहेत.

शीखांसाठी वेगळ्या राज्याची पहिली मागणी

स्वातंत्रपूर्व काळात पंजाब हा भारतातील सर्वात मोठा प्रांत होता. विद्यमान पाकिस्तानमधील पंजाब, भारतातील पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश असा एकत्रित प्रदेश पंजाब म्हणून ओळखला जात होता. १९२९ साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात मोतीलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराजचा प्रस्ताव मांडला. यावेळी तीन गटांनी या प्रस्तावाला विरोध केला. पहिला गट मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम लीग. दुसऱ्या गटाचे नेतृत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर करत होते. तिसरा गट हा मास्टर तारा सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दलाचा होता.

हेही वाचा- राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी धाडण्यावरून भारत-कॅनडामध्ये तणाव का? ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन’ म्हणजे काय? 

तारा सिंग यांनी सर्वप्रथम शीखांसाठी वेगळ्या राज्याची मागणी केली. १९४७ मध्ये या मागणीचे आंदोलनात रूपांतर झाले. त्याला ‘पंजाबी सुबा चळवळ’ असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्याच्या वेळी पंजाबचे दोन भाग झाले होते. शिरोमणी अकाली दल भारतातच भाषिक आधारावर स्वतंत्र शीख राज्याची मागणी करत होता. भारतात स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. संपूर्ण पंजाबमध्ये १९ वर्षे वेगळ्या शीख प्रांतासाठी आंदोलने आणि निदर्शने झाली. या काळात हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या.

एक घाव अन् तीन तुकडे

अखेरीस १९६६ मध्ये इंदिरा गांधी सरकारने पंजाबचे तीन तुकडे करण्याचा निर्णय घेतला. शीखबहुल पंजाब, हिंदी भाषिक हरियाणा आणि तिसरा भाग चंदीगड. चंदीगडला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. चंदीगड दोन्ही नवीन प्रदेशांची राजधानी बनवण्यात आली. याशिवाय पंजाबमधील काही पर्वतीय भाग हिमाचल प्रदेशात विलीन करण्यात आला. पंजाबला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला तरी या फाळणीमुळे अनेकजण नाराज झाले होते. काहीजण पंजाबला दिलेल्या प्रदेशांवर नाखूश होते, तर काहीजणांनी समान राजधानीच्या कल्पनेवर नाराजी व्यक्त केली होती.

शीखांसाठी वेगळा ‘खलिस्तान’

पंजाबमध्ये १९६९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार जगजीत चौहान हे तांडा विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला. निवडणूक हरल्यानंतर जगजीत सिंह चौहान ब्रिटनमध्ये गेले आणि त्यांनी तेथे खलिस्तान चळवळ सुरू केली. खलिस्तान म्हणजे खालशांचा देश. १९७१ मध्ये जगजीत सिंग यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये खलिस्तान चळवळीसाठी निधी देण्याची मागणी करणारी जाहिरातही दिली होती. जगजीत सिंग १९७७ मध्ये भारतात परतले आणि १९७९ मध्ये पुन्हा ब्रिटनला गेले. येथे जाऊन त्यांनी ‘खलिस्तान नॅशनल कौन्सिल’ची स्थापना केली.

आनंदपूर साहिब ठराव

अकाली दलाला पंजाबी चळवळीचा बराच राजकीय फायदा झाला. यानंतर प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने १९६७ आणि १९६९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कडवी झुंज दिली. मात्र, १९७२ ची निवडणूक अकालींच्या वाढत्या राजकीय आलेखासाठी वाईट ठरली. यावेळी काँग्रेस सत्तेवर आली. यामुळे शिरोमणी अकाली दलाला विचार करायला भाग पाडले.

हेही वाचा- हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचे सूत्रधार कोण?

१९७३ मध्ये, अकाली दलाने आपल्या राज्यासाठी अधिक अधिकारांची मागणी केली. या स्वायत्ततेची मागणी आनंदपूर साहिब ठरावाद्वारे करण्यात आली होती. आनंदपूर साहिब ठरावात शिखांनी अधिक स्वायत्त पंजाबसाठी वेगळ्या राज्यघटनेची मागणी केली. १९८० पर्यंत, आनंदपूर साहिब ठरावाच्या बाजूने शीखांचा पाठिंबा वाढला.

कोण होते जर्नेलसिंग भिंद्रनवाले?

१३ एप्रिल १९७८ रोजी अकाली कार्यकर्ते आणि निरंकारी यांच्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात १३ अकाली कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रोष दिवस साजरा करण्यात आला, ज्यामध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांनी भाग घेतला. पंजाब आणि शीखांच्या मागणीवर भिंद्रनवाले यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी ठिकठिकाणी प्रक्षोभक भाषणे देण्यास सुरुवात केली. जर्नेलसिंग भिंद्रनवाले हे आनंद साहिब ठरावाचे कट्टर समर्थक होते. रागी म्हणून प्रवास सुरू करणारा भिंद्रनवाले पुढे दहशतवादी बनले. प्रसिद्ध शीख पत्रकार खुशवंत सिंग यांनी भिंद्रनवालेंबद्दल म्हटलं होतं की, भिंद्रनवाले प्रत्येक शीख व्यक्तीला ३२ हिंदू लोकांना मारण्यासाठी भडकवायचे. यामुळे शिखांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे ते म्हणत.

१९८२ मध्ये भिंद्रनवाले यांनी शिरोमणी अकाली दलाशी हातमिळवणी करून असहकार चळवळ सुरू केली. या असहकार आंदोलनाचे पुढे सशस्त्र बंडात रूपांतर झाले. यादरम्यान भिंद्रनवाले यांना विरोध करणारे त्यांच्या हिटलिस्टमध्ये आले. त्यामुळे खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाब केसरीचे संस्थापक आणि संपादक लाला जगत नारायण यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी वृत्तपत्राच्या फेरीवाल्यालाही सोडले नाही. यानंतर भिंद्रनवाले सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी सुवर्ण मंदिरात घुसले. काही महिन्यांनंतर, भिंद्रनवाले यांनी शिख धर्माची सर्वोच्च संस्था ‘अकाल तख्त’ येथून आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. दोन वर्षे सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही.

भारतीय लष्कराला पाचारण का करावं लागलं?

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालेला पकडण्यासाठी गुप्त ‘स्नॅच अँड ग्रॅब’ ऑपरेशनला जवळपास मान्यता दिली होती. या ऑपरेशनसाठी २०० कमांडोना प्रशिक्षणही देण्यात आले. या काळात सर्वसामान्यांचे किती नुकसान होऊ शकते, असे इंदिरा गांधींना विचारले असता, त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही. दरम्यान, ५ जून रोजी काँग्रेसच्या सर्व खासदार आणि आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आणि गावोगावी हिंदूंच्या सामूहिक हत्या सुरू करण्याची योजना उघड झाल्यानंतर सरकारने भारतीय लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेतला.

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ काय होते?

भिंद्रनवाले आणि सशस्त्र समर्थकांना सुवर्णमंदिरातून हटवण्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारने सुरू केलेल्या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ असे नाव देण्यात आले. १ ते ३ जून १९८४ दरम्यान पंजाबमध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई सेवा बंद करण्यात आली होती. सुवर्ण मंदिराचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अमृतसरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती.

सीआरपीएफ रस्त्यावर गस्त घालत होती. सुवर्ण मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्गदेखील पूर्णपणे बंद करण्यात आले होते. या ऑपरेशनचा पहिला टप्पा ५ जून १९८४ रोजी रात्री १०:३० वाजता सुरू करण्यात आला. सुवर्ण मंदिर परिसराच्या आतील इमारतींवर समोरून हल्ला करण्यात आला. यादरम्यान खलिस्तानी दहशतवाद्यांनी लष्करावरही गोळीबार केला.

यावेळी सैन्याला पुढे जाता आले नाही. दुसरीकडे, पंजाबच्या उर्वरित भागातही लष्कराने गावे आणि गुरुद्वारांमधून संशयितांना पकडण्यासाठी एकाच वेळी कारवाई सुरू केली होती. एका दिवसानंतर जनरल के एस ब्रार यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी रणगाडे मागवले. ६ जून रोजी परिक्रमा मार्गावरील पायऱ्यावरुन रणगाडे उतरवण्यात आले. या गोळीबारात अकाल तख्त इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही तासांनंतर भिंद्रनवाले आणि त्यांच्या कमांडर्सचे मृतदेह सापडले.

७ जूनपर्यंत भारतीय लष्कराने परिसराचा ताबा घेतला. ऑपरेशन ब्लू स्टार १० जून १९८४ रोजी दुपारी संपले. या संपूर्ण कारवाईत लष्कराचे ८३ जवान शहीद झाले तर २४९ जखमी झाले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात ४९३ दहशतवादी आणि नागरिक मारले गेले. अनेक शीख संघटनांचा दावा आहे की या कारवाईदरम्यान किमान ३,००० लोक मारले गेले.

‘ऑपरेशन ब्लु स्टार’चे परिणाम

ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये निष्पापांनी जीव गमावल्याच्या निषेधार्थ कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक शीख नेत्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला. खुशवंत सिंग यांच्यासह मान्यवर लेखकांनी त्यांचे सरकारी पुरस्कार परत केले. चार महिन्यांनंतर, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत ८,००० हून अधिक शीख मारले गेले. सर्वाधिक दंगली दिल्लीत झाल्या. एका वर्षानंतर, २३ जून १९८५ रोजी कॅनडात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवले. यादरम्यान ३२९ जणांचा मृत्यू झाला. बब्बर खालसाच्या दहशतवाद्यांनी याला भिंद्रनवालेच्या मृत्यूचा बदला म्हटले होते.

१० ऑगस्ट १९८६ रोजी, ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल एएस वैद्य यांची पुण्यात दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी हत्या केली. खलिस्तान कमांडो फोर्सने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. तर ३१ ऑगस्ट १९९५ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या कारजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले. यामध्ये बेअंत सिंग मारले गेले. सिंग यांना पंजाबमधील दहशतवाद संपवण्याचे श्रेय दिले जात होते.