आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर देशातील नागरिकांमध्ये योगाबद्दल जागृती वाढत असून योगगुरूंना अच्छे दिन येणार आहेत. येत्या काही वर्षांमध्ये योगगुरूंची मागणी ३० ते ३५ टक्क्य़ांनी वाढणार असल्याचे असोचेमच्या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची मान्यता मिळविली होती. यासाठी २१ जून हा दिवस ठरविण्यात आला. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात योग दिनाची तयारी करण्यास सुरुवात केली. योग दिनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्नही काही संघटनांकडून करण्यात आला. यामुळे योगाला आपसूकच प्रसिद्धी मिळाल्याने नागरिकांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण झाली.
योगाचे प्रशिक्षण देणाऱ्यांना या निमित्ताने रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या असून हा व्यवसाय दवाखाने, आयुर्वेदिक रिसॉर्ट्स, सुट्टींतील वर्ग यांद्वारे येत्या काळात काही दशलक्ष डॉलरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. दरवर्षी योगा शिकण्यासाठी ३० ते ४० टक्के लोक येणार आहेत. यामुळे प्रशिक्षकांची मागणी ३० ते ३५ टक्के वाढत जाणार आहे. जगभरात योगाबाबत जागृती मोठय़ा प्रमाणावर होत आहे. भारत योगासाठीचे मोठे केंद्र बनणार असल्याचे असोचेमने आपल्या अहवालात म्हटले आहे.
कॉपरेरेट व व्यवसाय केंद्रांना आपल्या कर्मचाऱ्यांवरील ताण हलका करण्यासाठी योगाची मदत घ्यावी लागणार आहे. यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणावर योगा प्रशिक्षकांची गरज भासणार आहे. मनावरील ताण, आजार यावर योगा रामबाण उपाय ठरला आहे. यामुळे भविष्यात योगगुरूंसाठी ‘अच्छे दिन’ नक्कीच येणार आहेत.
योगगुरूंना ‘अच्छे दिन’ येणार !
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर देशातील नागरिकांमध्ये योगाबद्दल जागृती वाढत असून योगगुरूंना अच्छे दिन येणार आहेत.
First published on: 20-06-2015 at 05:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for yoga instructors likely to increase by 35 percent assocham