Donald Trump on Canada: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी जवळपास ४२ अध्यादेशांवर स्वाक्षरी केली. त्यात जगातील काही देशांवर टेरिफ लागू करण्यासोबतच अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या इतर देशातील नागरिकांना परत पाठवण्याच्या आदेशाचाही समावेश होता. त्यानुसार भारतात तीन विमानं भरून नागरिकांना परतदेखील पाठवण्यात आलं आहे. इतरही देशांमध्ये असे नागरिक परत पाठवले जात आहेत. हे आदेश पारित करण्याबरोबरच ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत भाष्य केलं आहे. यात कॅनडाबाबत त्यांनी केलेलं भाष्य चर्चेत आलेलं असतानाच त्यांच्या धमकीला कॅनडातील नागरिकांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?
कॅनडाशी असणारे अमेरिकेचे संबंध आणि खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण या प्रश्नांदर्भातील मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी भाष्य केलं होतं. कॅनडा हे ५१वं राज्य म्हणून अमेरिकेला जोडण्याचा मानस डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवला होता. त्यांच्या या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय समुदायात पडसाद उमटले होते. खुद्द कॅनडाकडून या भूमिकेचा निषेध करण्यात आला होता. याव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर मोठ्या प्रमाणावर टेरिफ लागू केलं आहे. त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली, तरी कॅनडाच्या बाबतीत अमेरिकेचं धोरण हे पुढील काळात अधिक कठोर असेल, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कॅनडातून यासंदर्बात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कॅनडाच्या राष्ट्रध्वज दिनी दिसला परिणाम!
१५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण कॅनडामध्ये ‘राष्ट्रध्वज दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातल नागरिकांनी ध्वज फडकावून आपला राष्ट्राभिमान व्यक्त केला. कॅनडात ध्वज तयार करणाऱ्या ‘फ्लॅग्ज अनलिमिटेड’ या कंपनीनं या वर्षी ध्वजांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्याचं नमूद केलं आहे. या कंपनीचे मालक मॅट स्किप यांनी यासंदर्भात रॉयटर्सला माहिती दिली आहे. “कॅनडाच्या ध्वजांची मागणी वाढणं, हा थेट सध्याच्या राजकीय स्थितीचा परिणाम आहे. कॅनडाच्या नागरिकांनी आपल्या एकीचं दर्शन घडवण्यासाठी राष्ट्रध्वज दिनी मोठ्या संख्येनं ध्वज फडकावून आपलं देशावरचं प्रेम व्यक्त केलं आहे”, असं मॅट स्किप म्हणाले.
कॅनडाच्या सत्ताधाऱ्यांचं देशवासीयांना आवाहन
दरम्यान, कॅनडाच्या सत्ताधाऱ्यांनी देशवासीयांना राष्ट्रध्वजासंदर्भात केलेल्या आवाहनाचाही यासंदर्भात परिणाम झाल्यां दिसून आलं. आपल्यातल्या एकीचं आणि देशाबद्दलच्या अभिमानाचं दर्शन घडवण्यासाठी सर्वांनी राष्ट्रध्वज फडकवावा, असं आवाहन कॅनडा सरकारनं केलं होतं.
अमेरिकेच्या आक्रमक धोरणाला उत्तर म्हणून कॅनडातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं दक्षिणेकडे अमेरिकेत नियोजित केलेल्या पर्यटन दौऱ्यांना नकार दिला आहे. तसेच, अमेरिकेच्या हद्दीतून आयात होणारं मद्य आणि इतर उत्पादनांना नाकारलं आहे. “ट्रम्प यांनी कॅनडाच्या बाबतीत केलेलं विधान हा एक खरा धोका असून कॅनडातील समृद्ध नैसर्गित साधनसंपत्तीवर त्यांचा डोळा आहे”, असं जस्टिन ट्रुडो यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या देशातील उद्योजकांच्या बैठकीत म्हटलं आहे.