एपी, तायपे

चीन, रशिया आणि इराणच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी इराणच्या वेगाने विस्तारत असलेल्या आण्विक कार्यक्रमाबद्दल तसेच बहुराष्ट्रीय चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत इराणवरील अमेरिकेचे निर्बंध संपुष्टात आणण्याची मागणी केली. ही मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला पत्र लिहिल्यानंतर करण्यात आली आहे.

ट्रम्प यांनी लिहिलेले पत्र प्रकाशित झाले नसले तरी इराणवर नव्याने निर्बंध लादण्याच्या त्यांच्या दबावाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून लिहिण्यात आले होते.

शुक्रवारी झालेल्या तिन्ही देशांच्या बैठकीत सर्व बेकायदेशीर एकतर्फी निर्बंध समाप्त करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. चीनचे उपपरराष्ट्रमंत्री मा झाओक्सू यांनी रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री रियाबकोव्ह सर्गेई अलेक्सिविच आणि इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम घारीबाबादी यांचे संयुक्त निवेदन वाचून दाखविले. यात राजकीय सहभाग तसेच परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर आधारित संवाद हाच एकमेव व्यवहार्य आणि व्यावहारिक पर्याय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चीन आणि रशियाचे विशेषत: ऊर्जा व्यवहारांद्वारे इराणशी घनिष्ठ संबंध आहेत. इराणने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला बॉम्ब वाहून नेणारे ड्रोन पुरवले आहेत.