देशातील जनता आणि आमच्या पूर्वजांनीच उभ्या केलेल्या संस्थांकडून लोकशाहीची हत्या कदापि सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यातून काहीतरी धडा घेतील. अशी मला आशा आहे, असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लगावला. उत्तराखंडमधील बहुमत चाचणीमध्ये हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार उत्तीर्ण झाले. त्यामुळे तोंडावर आपटलेल्या केंद्र सरकारने लगचेच एक पाऊल मागे घेत तेथील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.


ते म्हणाले, उत्तराखंडमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. भाजपने वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही चांगले काम करून त्याला प्रत्युत्तर दिले. देशातील जनता आणि आमच्या पूर्वजांनी उभ्या केलेल्या संस्था लोकशाहीची हत्या कदापि सहन करणार नाहीत. नरेंद्र मोदी यातून काहीतरी धडा घेतील, असे मला वाटते.
उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीच्या बाजूने ६१ पैकी ३३ आमदारांनी मतदान केले. या चाचणीचा निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला.

Story img Loader