पीटीआय, पॅरिस
कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित संसाधने आणि क्षमतानिर्मितीमध्ये लोकशाही पद्धतीने सर्वांना मुभा असावी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. पॅरिसमध्ये सुरू झालेल्या ‘एआय कृती शिखर परिषदे’मध्ये ते बोलत होते. परिषदेदरम्यान झालेल्या एका गोलमेज परिषदेतही भारत आणि फ्रान्सने एआयच्या लोकशाहीकरणाचा आग्रह धरला.
एआय क्षेत्रासाठी जागतिक चौकट आखण्यासाठी ‘ओपन सोर्स’च्या धर्तीवर सामूहिक प्रयत्न करणे आहे. जेणेकरून विश्वास, पारदर्शकता वाढण्याबरोबरच दुटप्पीपणापासूनही हे क्षेत्र दूर राहील,’ असे पंतप्रधान म्हणाले. धोरणे, अर्थव्यवस्था, सुरक्षा, समाज ‘एआय’मुळे बदलत आहे. मानवी समुदायासाठी ‘एआय’ ही या शतकातील एक संहिता असेल. आपली मूल्यव्यवस्था, परस्परविश्वास, संभाव्य धोके यांकरिता प्रशासन व्यवस्था तयार करण्यासाठी जागतिक पातळीवर सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘एआय’ तंत्रज्ञान स्वीकारण्यात भारताने आघाडी घेतली आहे. सार्वजनिक हितासाठी आम्ही ‘एआय’चा वापर करण्यावर भर देत आहोत. ‘एआय’वर आधारित भविष्यासाठी कौशल्यशिक्षणामध्ये गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
शिखर परिषदेदरम्यान झालेल्या गोलमेज परिषदेत दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झालेले केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांनीही तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा आग्रह धरला. भारत आणि फ्रान्सने विविध स्तरांवर धोरणात्मक पातळीवर आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्रित पुढे जायची गरज आहे. केवळ द्विस्तरावरील संबंधांना याचा फायदा होईल असे नव्हे, तर जागतिक स्तरावर त्याचा उपयोग होईल. ‘एआय’चा वापर जबाबदार पद्धतीने करण्यावर भारताचा भर राहील, असे सूद या वेळी म्हणाले. ‘एआय’च्या बाबतीत विविध देशांमधील मतभिन्नता शिखर परिषदेच्या निमित्ताने समोर आली. युरोपने ‘एआय’च्या नियमनावर आणि गुंतवणुकीच्या संदर्भात भर दिला तर चीनने सरकारपुरस्कृत कंपन्यांच्या माध्यमातून ‘एआय’च्या विस्ताराचा आग्रह धरला.
दिमाखदार स्वागत
फ्रान्समध्ये भारतीय समुदायाकडून मोदींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे. मोदी म्हणाले, ‘पॅरिसमध्ये स्मृतीत कायम राहील असे स्वागत झाले. प्रेम व्यक्त करताना येथील थंडीचा परिणामही भारतीय समुदायावर झाला नाही. भारतीय समुदायाने साध्य केलेल्या उपलब्धींचा सार्थ अभिमान आहे.’ तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनीदेखील गळाभेट घेऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. पॅरिसमध्ये रात्रीच्या मेजवानीला उपस्थित राहिल्यानंतर उभयतांत अनौपचारिक संवाद झाला. ‘माझे मित्र माक्राँ यांना भेटून आनंद झाला,’ अशी टिप्पणी मोदी यांनी ‘एक्स’वर केली. या वेळी मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांचीही भेट घेतली व निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
अतिरिक्त नियमनाला अमेरिकेचा विरोध
एआय क्षेत्रात अतिरिक्त नियमन केले, तर हे क्षेत्र जसे उभारी घेत आहे तितक्याच वेगाने ते संपेल, असा इशारा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी दिला. ते म्हणाले की, अमेरिकेत तयार होणारी ‘एआय’ यंत्रणा कुठल्याही प्रकारच्या विचारधारेची पुरस्कृत नसेल, याची काळजी ट्रम्प प्रशासन घेईल. नागरिकांच्या भाषणस्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारे गदा आणणार नाही. एका नव्या औद्योगिक क्रांतीला आपण सामोरे जात आहोत. वाफेच्या इंजिनचा शोध लागल्यानंतर जी औद्योगिक क्रांती झाली, त्याच्याच तोडीची ही क्रांती आहे, असे वान्स म्हणाले.