नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कार विक्री केलेल्या कार विक्रेत्यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. याशिवाय नोटाबंदीच्या निर्णयानंतर गाड्यांची नोंदणी केलेल्या ग्राहकांची माहितीदेखील आयकर विभागाने कार विक्रेत्यांकडे मागितली आहे. ८ नोव्हेंबरनंतर कार खरेदी करुन काळा पैसा पांढरा केलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाने कार विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे.
नोव्हेंबरमध्ये बँकेत जास्त रक्कम जमा करणाऱ्या आणि विक्रीचा आकडा जास्त दाखवणाऱ्या कार विक्रेत्यांना त्यांच्या ग्राहकांची माहिती देण्याचे आदेश आयकर विभागाने दिले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर गाडी खरेदी केलेल्या प्रत्येकाची माहिती आयकर विभागाने मागवली आहे.आयकर विभागाने कार विक्रेत्यांना त्यांच्या ग्राहकांची माहिती देण्याची सूचना केली आहे. या माहितीच्या आधारे संबंधितांची चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर कार खरेदी करणाऱ्यांना १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान नोटीस बजावण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती कार विक्रेत्यांनी आयकर विभागाला देण्यास सुरुवात केली आहे.
‘आयकर विभागाने आम्हाला नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने आम्हाला ग्राहकांची माहिती देण्यास सांगितले आहे. काही लोकांनी त्यांच्याकडे असणारा काळा पैसा कार खरेदी करण्यासाठी वापरला असा संशय आयकर विभागाला आहे. काही लोकांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कार खरेदी केली. मात्र काही कार विक्रेत्यांनी हे व्यवहार ८ नोव्हेंबरच्या आधीचे दाखवले,’ असे एका कार विक्रेत्याने म्हटले आहे.
कार खरेदी केलेल्यांची माहिती कार विक्रेत्यांकडून मागिवली असल्याच्या वृत्ताला आयकर विभागाने दुजोरा दिला आहे. ‘नोव्हेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे जास्त असणाऱ्यांना आणि अधिक रक्कम बँकेत जमा केलेल्या देशभरातील कार विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत,’ असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द झाल्या. त्यावेळी घरात बेहिशेबी पैसा असणाऱ्या लोकांनी सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी केली. सोने खरेदी करुन अनेकांनी त्यांच्याकडे असणारा काळा पैसा सोनेरी केला होता. यासोबतच अनेकांनी कार आणि महागड्या मोबाईलची देखील खरेदी केली होती. यातील कार खरेदी करुन काळा पैसा पांढरा करणारे आता आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत.