केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चटके सामान्य जनतेप्रमाणे नेत्यांनाही सहन बसत असल्याचे समोर आले आहे. केंद्रात सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी खात्याचे मंत्री असलेल्या सदानंद गौडा यांना नोटाबंदीमुळे अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. सदानंद गौडा यांचे बंधू भास्कर गौडा यांचे मंगळवारी काविळीच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळुरू येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रूग्णालय प्रशासानाने त्यांच्यावरील उपचारांचा खर्चाची रक्कम ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात स्विकारण्यास नकार दिला. यावेळी सदानंद गौडा यांनी रूग्णालयाला धनादेश देण्याचीही तयारी दाखविली. मात्र, त्यालाही रूग्णालयाकडून नकार देण्यात आल्याचे वृत्त आहे. या सगळ्या गोंधळामुळे भास्कर गौडा यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जात नव्हता. रूग्णालय प्रशासाने गौडा यांना ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा स्विकारत नसल्याचे लिहूनही दिले. मात्र, काहीवेळानंतर रूग्णालय प्रशासनाने उपचारांच्या खर्चाची रक्कम धनादेशाद्वारे स्विकारण्याची तयारी दाखविली. त्यामुळे भास्कर गौडा यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. भास्कर यांना दहा दिवसांपूर्वी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सदानंद गौडा यांनी संबंधित रूग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतरही रूग्णालये, पेट्रोल पंप आणि रेल्वे स्टेशनवर ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक रूग्णालयांकडून या नोटा स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या कैलाश रूग्णालयातही जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

Story img Loader