विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. अनेक दिग्गज कलाकारांसह पंतप्रधान मोदी आणि राजकारण्यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या चित्रपटासंदर्भात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारबद्दल मत व्यक्त केलं आहे.
“काश्मिरी पंडितांना भयंकर त्रास सहन करावा लागला. त्यांच्या हक्कांसाठी आपण उभे राहिले पाहिजे. पण, त्यासाठी काश्मिरी मुस्लिमांना गुन्हेगार ठरवण्याने काश्मिरी पंडितांना कोणताही फायदा होणार नाही. द्वेष केवळ लोकांना विभाजित करतो आणि मारतो. काश्मिरी पडितांना न्याय हवा आहे, जो मुस्लिमांना गुन्हेगार ठरवून मिळणार नाही. त्यामुळे सर्वांचंच ऐकून घेतलं पाहिजे, सर्वांनाच मदत झाली पाहिजे,” असं शशी थरूर यांनी ट्वीट करून म्हटलंय.
शशी थरूर यांनी हे ट्वीट करताना एका फेसबूक पोस्टचा संदर्भ दिलाय. त्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “काश्मिरी पंडितांचे दुःख खरे होते/आहे. एखाद्या प्रपोगंडा करणाऱ्याने या विषयावर चित्रपट बनवला म्हणून किंवा उजव्या विचारसरणीने जमेल तेव्हा ते हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरातून हाकलून दिले नाही, असा होत नाही. संख्येने काही फरक पडत नाही. एखाद्या अल्पसंख्याक समुदायातील ३ सदस्य मारले गेले असतील तरीही, कोणत्याही निष्पाप जीवाला द्वेषामुळे जीव गमवावा लागू नये.”
The Kashmir Files आधी काश्मीरच्या परिस्थितीवर बनले होते ‘हे’ लोकप्रिय चित्रपट
“काश्मिरी पंडितांची नवी पिढी त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या कथा मांडत आहे. त्यांच्या व्यथा ऐकल्या जाव्यात, पण त्याच प्रमाणे काश्मिरी मुस्लिमांच्या व्यथाही ऐकल्या जाव्या. ज्यांना त्रास सहन करावा लागला, त्यांच्या वेदनाही तुम्ही मान्य करत नसाल तर तुम्ही कोणतेही मतभेद सोडवू शकत नाही,” असं त्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे.