Deportation Of Indians From US : अमेरिकेची सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प जे काही निर्णय घेत आहेत त्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत गेलेल्या दुसऱ्या देशातील नागरिकांबाबतही कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बेकायदेशीररित्या अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. ६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेतून १०४ भारतीयांना लष्करी विमानातून माघारी पाठवण्यात आले आहे. या मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने परत पाठवलेल्या भारतीयांनी त्यांचे अनेक धक्कादायक अनुभव देखील सांगितले आहेत. या १०४ पैकी ३० पंजाबमधील आणि ३३ गुजरातमधील होते. पंजाब आणि गुजरातमधील किमान १५ लोकांना मेक्सिको-अमेरिका सीमेवरून ताब्यात घेण्यात आले होते. कारण ते अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या २ महिन्यांतच बेकायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश करत असताना यातील बहुतांश लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, निर्वासितांच्या म्हणण्यांनुसार, त्यातील काहींनी अमेरिकेला पोहोचण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता. तसेच काहींनी एजंटच्या माध्यमातून अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केला होता. यातील काहींनी ३० लाख ते १ कोटी रुपये काहींनी खर्च केले होते अशी माहिती आता समोर आली आहे. यामध्ये अमेरिकेत पोहोचण्यासाठी अनेकदा धोकादायक मार्ग, वेगवेगळ्या देशांमधून प्रवास आणि वाहतुकीच्या विविध पद्धतींचा वापर करण्यात आला होता. यातील मोहालीच्या जुरैत गावातील २१ वर्षीय प्रदीप सिंग सहा महिन्यांपूर्वी घर सोडून मेक्सिको-अमेरिका सीमेवर पोहोचला होता. यासाठी त्याने तब्बल ४२ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, त्याला दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले.

तसेच फतेहगढ साहिबमधील कहानपूर गावातील जसविंदर सिंग (३०) हे अमेरिकेला जाण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निघाले होते. यामध्ये त्यांनी ५० लाख रुपये खर्च करून १५ जानेवारी रोजी ते अमेरिकेच्या सीमेवर पोहोचले. तसेच पतियाळातील अहरु खुर्द गावातील अमृत सिंग हा आठ महिन्यांपूर्वी भारतातून निघाला आणि जानेवारीच्या मध्यात अमेरिकेच्या सीमेवर पोहोचला. या दोघांनाही सीमेवरवरून ताब्यात घेण्यात आलं होतं.

दरम्यान, अमेरिकेच्या सीमेवर पकडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. १ जानेवारी रोजी पतीला भेटण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलासह पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील भदास गाव सोडलेल्या लवप्रीत कौरने अमेरिकेची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी कायदेशीररित्या मेक्सिकोला पोहोचण्यासाठी शेंगेन व्हिसाचा वापर केला होता. मात्र, २७ जानेवारी रोजी अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली होती. जानेवारीच्या सुरुवातीला प्रवास केलेल्या वडोदरा येथील २९ वर्षीय महिलेलाही हद्दपार करण्यात आले. त्या महिलेच्या आईने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आम्ही अनेक दिवस तिच्या संपर्कात नव्हतो. पण आता ती पुन्हा सुखरूप घरी परतली याचा आम्हाला आनंद आहे.”