Illegal Migration: अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना अमेरिकेने पुन्हा भारतात पाठवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर अमेरिकेने अवैध स्थलांतरितांचा मुद्दा हाती घेतला असून अमेरिकेत नियमबाह्य प्रवेश करणाऱ्यांना त्यांच्या मूळ देशात पुन्हा पाठविण्यास सुरुवात केली आहे. भारतात १०४ नागरिक परतल्यानंतर आता त्यांचा अमेरिकेत पोहोचण्याचा प्रवासही उलगडला जात आहे. ज्यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. राजकुमार हिरानी यांनी अभिनेता शाहरुख खानला घेऊन डंकी चित्रपट आणला होता. यात गैरमार्गाने कसे दुसऱ्या देशात प्रवास केला जातो, याची कथा चितारली होती. आताही अमेरिकेतून परत पाठविलेल्या नागरिकांच्या अशाच कथा समोर येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवप्रित कौर यांना त्यांच्या १० वर्षांच्या मुलासह अमेरिकेतून भारतात पाठविण्यात आले. २ जानेवारी रोजी लवप्रित कौर यांनी लहान मुलासह पंजाबहून युनायटेड स्टेट्सचा प्रवास सुरू केला. मात्र महिन्याभरातच त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला. अमेरिकेत पोहोचण्यासाठी लवप्रित कौर यांनी एजंटला जवळपास एक कोटी रुपये दिले होते. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना लवप्रित कौर म्हणाल्या, आम्हाला अमेरिकेत पोहचण्यासाठी डंकी मार्गाद्वारे अनेक देशांतून प्रवास करावा लागला. एजंटने आम्हाला सांगितले होते की, तो आम्हाला थेट अमेरिकेत घेऊन जाईल. पण आम्हाला खूप अनुभव आला, हे सांगताना लवप्रित कौर यांना अश्रू अनावर झाले होते.

आम्ही आधी कोलंबियाच्या मेडेलिन येथे विमानाने नेण्यात आले. तिथे आम्ही दोन आठवडे मुक्काम केला. नंतर पुन्हा विमानाने सॅन साल्वाडोर येथे नेण्यात आले. तिथून आम्ही तीन तासांहून अधिक काळ चालत चालत ग्वाटेमलाला गेलो. तिथून टॅक्सीने मेक्सिकन सीमेवर पोहोचलो. मेक्सिकोत दोन दिवस राहिल्यानंतर अखेर २७ जानेवारी रोजी आम्ही अमेरिकेत पोहोचलो.

मात्र अमेरिकेची सीमा ओलांडताच अमेरिकन अधिकाऱ्यांनी लवप्रित कौर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. “आम्ही अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्या लोकांनी आमचे सीम कार्ड फेकून देण्यास सांगितले. तसेच कानातील आणि हातात घातलेल्या बांगड्या काढण्यास सांगितल्या. माझे सामान आधीच्या देशात हरवले होते. त्यामुळे माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नव्हते. आम्हाला पाच दिवस एका शिबिरात ठेवले गेले. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी आमच्या कमरेपासून पायाला आणि हाताला साखळदंड बांधले गेले. फक्त मुलांना मोकळे सोडले गेले.”

एजंटला पैसे देण्यासाठी कर्ज काढले

अमेरिकेत गेल्यानंतर मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल, या आशेपोटी लवप्रितच्या कुटुंबियांनी कर्ज काढून एक कोटींची रक्कम गोळा केली होती. पण आता सर्व काही उध्वस्त झाल्याची भावना निर्माण झाली आहे. एजंटने आम्हाला सांगितले होते की, ते कॅलिफोर्नियातील आमच्या नातेवाईकांकडे आम्हाला पोहोचवतील. पण आमची सर्व स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत. सरकारने या एजंटवर कारवाई करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशीही मागणी लवप्रित कौर करत आहेत.