बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग पुन्हा एकदा २१ दिवसांचा फरलो (फर्लो) मंजूर करण्यात आला आहे. राम रहीमला मागील तीन वर्षांत आठव्यांदा अशाप्रकारे दिलासा मिळाला आहे. या वर्षी २० जुलै रोजी गुरमीत राम रहीमला ३० दिवसांची पॅरोल मिळाली होती. मागील २२ महिन्यात राम रहीम तब्बल १८२ दिवस तुरुंगाबाहेर आहे. त्यामुळे राम रहीम नेमका कोणत्या गुन्ह्यात दोषी आहे, त्याला किती वर्षांची शिक्षा झालीये? त्याची कधी आणि किती काळासाठी तुरुंगातून सुटका झाली? पॅरोल आणि फरलो यामधील नेमका फरक काय आहे? अशा सर्व बाबींचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…
गुरूमीत राम रहीमला कोणत्या आरोपांमध्ये शिक्षा?
२८ ऑगस्ट २०१७ ला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरूमीत राम रहीमला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. रोहतक येथील तुरुंगात तो २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. दुसरीकडे, १७ जानेवारी २०१९ ला पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येच्या गुन्ह्यातही राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राम रहीमची कधी आणि किती काळासाठी सुटका झाली?
२४ ऑक्टोबर २०२०- १ दिवसांची पॅरोल
२१ मे २०२१ – १ दिवसांची पॅरोल
७ फेब्रुवारी २०२२ – २१ दिवसांचा फरलो
जून २०२२ – ३० दिवसांचा पॅरोल
ऑक्टोबर २०२२ -४० दिवसांचा पॅरोल
२१ जानेवारी २०२३ – ४० दिवसांचा पॅरोल
२० जुलै २०२३ – ३० दिवसांचा पॅरोल
२० नोव्हेंबर २०२३ – २१ दिवसांचा फरलो
फरलो आणि पॅरोलमध्ये नेमका फरक काय आहे?
मागील तीन वर्षांच्या काळात राम रहीम अनेकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला कधी पॅरोल तर कधी फरलो मिळाला आहे. पण फरलो आणि पॅरोलमध्ये नेमका फरक काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे शिक्षा झाल्यानंतर एक वर्षानंतर कधीही पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. परंतु ज्या कैद्यांना अनेक वर्षांची शिक्षा झाली आहे, अशा कैद्यांना फरलो मंजूर केला जातो. यातील महत्त्वाची अट म्हणजे संबंधित कैद्याने तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतरच त्याला फरलो दिला जाऊ शकतो.
एखादा कैदी जेवढे दिवस पॅरोलवर तुरुंगाबाहेर राहतो, त्याला नंतरच्या काळात तितकेच दिवस अधिक तुरुंगवास भोगावा लागतो, असाही नियम आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कैद्याला २१ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला असेल, तर त्याला अतिरिक्त २१ दिवसांची शिक्षा भोगावी लागते. पण फरलोशी संबंधित असा कोणताही नियम नाही. एखादा कैदी जितके दिवस फरलोवर तुरुंगाबाहेर असेल त्याचे शिक्षेतील तितके दिवस कमी होतात.