पीटीआय, पाटणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमधील चंपारण येथे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेला ‘निळीचा सत्याग्रह’ भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील महत्त्वाचा टप्पा आहे. या सत्याग्रहादरम्यान, महात्मा गांधी यांच्या जेवणामध्ये विष कालवण्याचे ब्रिटिश अधिकाऱ्याचे आदेश मानण्यास खानसामा बटक मियाँ यांनी साफ नकार दिला होता. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५२ मध्ये बटक मियाँ यांच्या नातवंडांना संपूर्ण जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन ७१ वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही.

ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आदेश न पाळण्याची बटक मियाँ यांना शिक्षा भोगावी लागली. त्यांचा बराच छळ करण्यात आला आणि त्यांना त्यांच्या जमिनीवरून बेदखल करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर १० वर्षांनी, १९५७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. महात्मा गांधी यांनी १९१७ मध्ये, नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी अविभाजित चंपारण जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या मोतिहारीला भेट दिली.

त्या वेळी निळीच्या मळय़ाचा ब्रिटिश व्यवस्थापक आयर्विन याने गांधीजींना रात्री भोजनासाठी आमंत्रित केले आणि आपला खानसामा बटक मियाँ यांना गांधीजींना दुधातून विष देण्यास सांगितले. मात्र, ही आज्ञा पाळण्यास बटक मियाँ यांनी नकार दिला आणि हा कटही उघड केला. यामुळे गांधीजींचे प्राण वाचले. पुढे नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा हा सत्याग्रह चंपारणचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाला. अखेरीस ब्रिटिश सरकारला आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडले होते.

याविषयी माहिती देताना बटक मियाँ यांचे नातू कलम अन्सारी यांनी सांगितले की, ‘आमचे आजोबा बटक मियाँ यांनी गांधीजींना या कटाची माहिती दिली. पण या देशभक्तीची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि त्यांचा छळ करण्यात आला. त्यांना त्यांच्या घरातून हुसकावून लावण्यात आले आणि कुटुंबासह गाव सोडून जाण्यास भाग पाडले गेले.’

देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना १९५० मध्ये मियाँ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दैन्यावस्थेबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तिरहुट विभागाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना मियाँ आणि त्यांच्या रशीद अन्सारी, शेर मोहम्मद अन्सारी आणि मोहम्मद जान अन्सारी या तीन मुलांना ५० एकर जमीन देण्याचे आदेश दिले. मात्र, आम्हाला पश्चिम चंपारण जिल्ह्यातील अकवा परसावनी गावात केवळ सहा एकर जमीन देण्यात आली, त्यापैकी पाच एकर जमिनीची नदीमुळे धूप झाल्यामुळे केवळ एक एकर जमीन उरली आहे, अशी माहिती कलम अन्सारी यांनी दिली. आम्हाला सुरक्षित जागी जमीन मिळावी यासाठी खूप धडपड केली पण त्याचा उपयोग झाला नाही, असे त्यांनी सांगितले. लोक आमच्या पूर्वजांचा त्याग विसरले आहेत असे दिसते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाचे आश्वासन

पश्चिम चंपारणचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार राय यांनी सांगितले की, मियाँ यांच्या कुटुंबाला सहा एकर जमीन देण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबाला भेडसावणाऱ्या चिंतेची जिल्हा प्रशासन चौकशी करेल आणि योग्य उपाययोजना करेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Descendants of mahatma gandhi life saving khansamya waiting for land amy
Show comments