पीटीआय, महाकुंभनगर
महाकुंभनगरमध्ये बुधवारी भल्या पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी चप्पल, बूट, कपडे, पिशव्या असे काही सामान विखुरलेल्या अवस्थेत होते. त्यापैकी अनेक वस्तूंना वाली उरले नव्हते किंवा बेपत्ता झाले होते. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर संगमावर स्नान करण्यासाठी भाविक एकमेकांना ढकलत होते, धक्काबुक्की करत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनानुसार, संगमावर भाविकांची गर्दी अचानक वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. देशभरातून काही कोटी भाविक कुंभमेळ्यासाठी जमले आहेत. भाविकांना स्नान करण्यासाठी बुधवारी पहाटे तीन वाजताचा शुभ मुहूर्त गाठायचा होता. आसाममधून आलेल्या मधुमिता यांनी सांगितले की, ‘‘अनेक भाविकांनी शुभ मुहूर्ताची संयमाने वाट पाहिली होती. त्यापैकी अनेक जण जमिनीवर बसले होते तर काही घाटांजवळ पहुडलेले होते. स्नानाच्या जागेवर बॅरिकेड उभारण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर भाविकांची अचानक गर्दी उसळली आणि त्यामध्ये बॅरिकेड पडले. या गोंधळात जमिनीवर झोपलेल्या किंवा बसलेल्या लोक तुडवले गेले.’’
बिहारच्या बेगुसराई येथून आलेल्या बदामादेवी या वृद्ध भाविक महिलेला घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करताना रडू कोसळले. आपण महाकुंभामध्ये स्नान करायला आलो होतो असे त्यांनी सांगितले. ‘‘आम्हाला माहित आहे की, आपल्या आयुष्यात ही संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळेच आम्ही शुभ मुहूर्ताला गंगेत स्नान करण्यासाठी इतक्या लांबून प्रवास करून आलो होतो आणि प्रतीक्षा करत होतो.’’ झारखंडच्या पलामू येथून आलेल्या राम सुमिरन यांनी बहुतेक गंगामाईची हीच इच्छा असावी असे म्हणत स्वत:ची समजूत काढायचा प्रयत्न केला.
पाच कोटी भाविकांचे स्नान
चेंगराचेंगरीमुळे स्नान काही काळ थांबवण्यात आले होते, ते दुपारी पुन्हा सुरू करण्यात आले. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत रविंद्र पुरी यांच्या नेतृत्वाखाली आखाड्यांची संगमाच्या दिशेकडे मिरवणूक काढण्यात आली. मात्र ही मिरवणूक नेहमीइतकी भव्य नव्हती. चेंगराचेंगरी हा विरोधकांचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. या मिरवणुकीवर हेलकॉप्टरमधून फुले उधळण्यात आली. कुंभमेळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पाच वाजेपर्यंत पाच कोटींपेक्षा जास्त भाविकांनी गंगा आणि संगमावर स्नान केले होते. त्यामध्ये १० लाख कल्पवासींचा समावेश आहे. १३ जानेवारीला महाकुंभ सुरू झाल्यापासून आतापर्यंत १९.९४ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष?
चेंगराचेंगरीपूर्वी प्रयागराजचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत भाविकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत असल्याची ध्वनिचित्रफित प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये ते भाविकांना गर्दी टाळण्याचा आणि घाटाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर न झोपण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. ‘‘उठा, उठा… स्नान करून घ्या. अनेक लोक येणार आहेत, चेंगराचेंगरी होऊ शकते,’’ असे ते सांगताना ध्वनिचित्रफितीमध्ये ऐकू येत आहे. भाविकांनी स्वत:च्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन ते करत होते.
‘व्यवस्थापन लष्कराकडे सोपवावे’
महाकुंभाचे व्यवस्थापन लष्कराकडे सोपवावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. जागतिक दर्जाच्या व्यवस्थेचे दावे करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा असे ते म्हणाले. प्रयागराजमध्ये १२ वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी अखिलेश उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी होते. काँग्रेसनेही योगी आदित्यनाथ यांच्याकडून महाकुंभाचे व्यवस्थापन काढून घेऊन अधिक चांगल्या प्रशासकाकडे सोपवावे आणि अतिमहत्त्वाच्या लोकांची ये-जा थांबवावी अशी मागणी केली. ‘आप’नेही महाकुंभातील व्हीआयपी संस्कृतीवर टीका केली आणि ती थांबवण्याची मागणी केली.
हा पवित्र क्षण १४४ वर्षांनंतर आल्याचे आम्हाला माहीत होते. कोणालाही तो गमवायचा नव्हता. स्नान करण्यासाठी शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा करत अनेक भाविक जमिनीवर पडून होते. कुठूनतरी अचानक खूप मोठी गर्दी आली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये अनेकजण तुडवले गेले.– प्रत्यक्षदर्शी भाविक
साधूसंत व महाकुंभाला आलेल्या भाविकांमध्ये या व्यवस्थेविषयी विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी महाकुंभाचे प्रशासन व व्यवस्थापन उत्तर प्रदेश सरकारकडून काढून घेऊन तातडीने लष्कराकडे सोपवावे.– अखिलेश यादव, अध्यक्ष, सप