डिझेलच्या दरातील लिटरमागे ४५ पैसे या किरकोळ दरवाढीवर सरकार माघार घेणार नाही, असे पेट्रोलियम मंत्री एम.वीरप्पा मोईली यांनी शनिवारी सांगितले, रेल्वेसारख्या डिझेलच्या मोठय़ा ग्राहकांनी बाजारभावाने इंधन खरेदी करण्यासाठी स्वत:चे आर्थिक मार्ग शोधावेत, अशी सल्लावजा सूचनाही त्यांनी केली.
काँग्रेसच्या विचारमंथन शिबिरासाठी येथे आले असता त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, डिझेलच्या दरवाढीवर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
सरकारने दोनच दिवसांपूर्वी डिझेलचे दर चार महिन्यांच्या खंडानंतर कार व ट्रक या किरकोळ ग्राहकांसाठी लिटरला ४५ पैसे इतके वाढवले आहेत, तर संरक्षण व रेल्वेसाठी डिझेलचे दर दहा रुपयांनी वाढवले आहेत त्यामुळे अनुदानाचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे.
स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट धरून किरकोळ विक्रीसाठी डिझेलचे दर दिल्लीत ५० पैशांनी वाढले असून ते लिटरला ४७ रु. ६५ पैसे इतके झाले आहेत.
डिझेलचा मोठय़ा प्रमाणात वापर करणाऱ्या रेल्वे व संरक्षण खात्यासाठी मात्र डिझेलची दरवाढ १७.७७ टक्के झाली असून त्यांच्यासाठी दिल्लीतील डिझेलचा दर हा ५६ रुपये ८८ पैसे झाला आहे. डिझेल विक्रीत लिटरमागे ९ रुपयांचा तोटा होत असून तो पूर्ण नाहीसा होईपर्यंत बाजारपेठ दराने डिझेलचे दर वाढवण्यास सरकारने तेल कंपन्यांना परवानगी दिली आहे. १७ जानेवारीला सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मोईली यांनी सांगितले की, २००२ मध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर नियंत्रण काढून घेतले होते पण यूपीए सरकारने डिझेलला अनुदान दिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा