डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतात अनेकदा उपेक्षा, तिरस्कार आणि अपमानाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यांनी कधीही देश सोडण्याची भाषा केली नाही, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते गुरूवारी लोकसभेत संविधान दिनावरील चर्चेदरम्यान बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपमान सहन करावा लागला म्हणून मी दुसऱ्या देशात जाऊन राहतो, असे त्यांनी कधीही म्हटले नाही. त्याऐवजी त्यांनी भारताला अधिक सशक्त बनिवण्याचे प्रयत्न केले. सध्या अभिनेता आमिर खानचे असहिष्णुतेमुळे देश सोडून जाण्याच्या विचारात होतो, हे वकव्य वादाचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आपल्या वक्तव्यातून टीकाकारांना अप्रत्यक्षपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

तसेच आजच्या काळात राजकीय पोळी भाजण्यासाठी सेक्युलर/ धर्मनिरपेक्ष शब्दाचा सर्वाधिक दुरुपयोग होत असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी विरोधकांवर केला. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नव्हे त्यामुळे सेक्युलर या शब्दाचा वापर थांबवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष शब्दप्रयोग थांबवावा. त्याऐवजी हिंदीत ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द वापरला जावा असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Story img Loader