गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख हत्येप्रकरणातील आरोपी अमित शहा यांची लवकरच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. शहा हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जवळचे साथीदार म्हणून ओळखले जातात. मोदी यांना भाजप पंतप्रधानपदाची उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्षांतर्गत काही जणांकडून त्यासाठी दबाव टाकला जातोय. त्यापार्श्वभूमीवर शहा यांना पक्षात उच्च पद देण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय
पुढील आठवड्यात भाजपची महत्त्वाची बैठक होते आहे. त्यावेळी शहा यांना सरचिटणीस करण्यावर शिक्कामोर्तब होईल, असे समजते.
शहा यांना पक्षात राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पद देण्यात येणार असल्यामुळेच त्यांना गुजरातमधील मंत्रिमंडळात घेण्यात आले नव्हते, अशी माहिती कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांनी दिली. शहा यांना पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावर स्थान देण्यात येणार हे नक्की असून, फक्त घोषणा कधी होईल, याचीच उत्सुकता असल्याचे अमीन यांनी सांगितले.