Shiv Sena MP Naresh Mhaske in Lok Sabha : शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रातील खुलताबाद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील मुघल बादशाह औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बुधवारी (१२ मार्च) लोकसभेत ही मागणी मांडली. सभागृहाच्या शून्य प्रहरात म्हस्के यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण ३,६९१ स्मारके व कबरींपैकी २५ टक्के वास्तू या मुघल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने उभारलेल्या आहेत. या लोकांनी भारत देश, या देशाची संस्कृती व परंपरेविरोधात कामं केली होती. औरंगजेबाची कबर ही त्यापैकी एक आहे.”
खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, हिंदूंची मंदिरं पाडली. या मंदिरांमधील संपत्ती लुटली. औरंगजेबाने शिखांच्या नवव्या व दहाव्या धर्मगुरूंची हत्या केली होती. त्याच औरंगजेबाची कबर खुलताबादमध्ये असून एएसआयने ती संरक्षित व संवर्धित केली आहे. औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट करायला हव्यात.”
औरंगजेबामुळे राजकारण का तापलं?
‘छावा’ हा बॉलिवूड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये औरंगजेबाचं व्यक्तिमत्व पाहायला मिळालं. त्यामुळे औरंगजेबाबद्दलचा लोकांच्या मनातील संताप उफाळून आला आहे. दुसऱ्या बाजूला, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाबाबत एक वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं. ‘औरंगजेब क्रूर शासक नव्हता’, असं आझमी यांचं म्हणणं आहे. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अनादर केल्याचा आरोप केला. आझमी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्यांचे विधानसभेतून निलंबन करण्यात आले.”
महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही. आता हाच मुद्दा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. औरंगजेब म्हणजेच मुही अल दीन मुहम्मद याने दख्खन प्रांतावर ४९ वर्षे राज्य केले. सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील भागांमध्येच औरंगजेबाने आयुष्याचा शेवटचा काळ व्यतीत केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे तो मरण पावला. त्याच ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली आहे. या कबरीला आता विरोध होत आहे.