‘एसएआर’द्वारे घेतलेल्या छायाचित्रांमुळे दुजोरा

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामध्ये मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचे नुकसान झाले आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. मात्र गोपनीय माहितीच्या अभावामुळे नेमके किती दहशतवादी ठार झाले ते सध्या सांगता येणे शक्य नाही.

गुप्तचर यंत्रणांकडे सिंथेटिक अपर्चर रडारच्या (एसएआर) साहाय्याने घेण्यात आलेली छायाचित्रे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. लक्ष्य करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज २००० ने पाच एस-२००० प्रिसिजन गायडेड म्युनिशनच्या (पीजीएम) साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचे छायाचित्रात दिसत आहे. भारताने हल्ला केल्याचे पाकिस्तानने मान्य केले असले तरी तेथे दहशतवाद्यांचे अड्डे होते किंवा काही नुकसान झाल्याचे मान्य करण्यास नकार दिला आहे.

एका इमारतीचा वापर गेस्ट हाऊसप्रमाणे करण्यात येत होता, तेथे मसूद अझरचा भाऊ राहात होता, एल आकाराची एक इमारत होती. तेथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहात होते, दोन मजल्यांच्या एका इमारतीमध्येही प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहात होते, या सर्व इमारतींना लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. एसएआरच्या साहाय्याने घेण्यात आलेल्या छायाचित्रांच्या स्वरूपात पुरावा उपलब्ध आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हल्ला करण्यात आलेली जागा पाकिस्तानच्या लष्कराने सील केली असल्याने कोणतीही माहिती मिळविणे गुप्तचर यंत्रणांसाठी कठीण झाले आहे, त्यामुळे हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या सध्या अंदाजित आहे, असेही अधिकारी म्हणाला.

इस्राएली बनावटीच्या बॉम्बचा वापर

एसएआरने घेतलेली छायाचित्रे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांइतकी स्पष्ट नाहीत, मंगळवारी ढग दाटले असल्याने आम्ही उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊ शकलो नाही, असे अधिकारी म्हणाला. मदरशांची निवड सावधगिरी बाळगून करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाने हल्ल्यासाठी इस्राएल बनावटीच्या बॉम्बचा वापर केला, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader