पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या तरुण खासदाराचे संसदेतील भाषण ऐकून तू एक दिवस देशाचा पंतप्रधान होशील, अशी थाप त्याच्या पाठीवर दिली होती, त्या वेळी सत्ताधारी व विरोधक यांचे विळय़ाभोपळय़ाचे नाते नव्हते. त्याच तरुणाला आता नव्वदाव्या वर्षी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.
जन्म
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र आहेत. जातीने ब्राह्मण असून त्यांनी संसदेतील पन्नास वर्षांच्या काळात मोठा प्रभाव पाडला.
अजातशत्रू
विरोधकांचे असलेले सरकार सर्वाधिक काळ चालवण्याची सर्कस अनेक पक्षांची मोट एकत्र बांधून केली. त्यासाठी त्यांनी मवाळ चेहराही धारण केला. देशाच्या राजकारणाची दिशा बदलून गांधी घराण्याच्या प्रभावातून बाहेर आणणाऱ्या नेत्यांमध्ये ते एक होते. त्यांचे सर्व पक्षांत मित्र होते, त्यामुळे भाजपसाठी ते मित्रपक्ष जोडू शकले. बाबरी मशिदीच्या पतनानंतर त्यांना हे सहेतुक करावे लागले.
वक्ता दशसहस्रेषु
अटलबिहारी वाजपेयी हे वक्ता दशसहस्रेषु आहेत. हातवारे, बोलण्यातील विराम, नर्मविनोदी शैली यांच्या मदतीने त्यांनी अनेकांच्या फिरक्या घेतल्या. त्यांचा दीर्घ विराम ते पुढे काय बोलणार यासाठी क्षणभर श्रोत्यांना वाव देत असत. त्यांची ती लकब सर्वाना भावली.
भारत-पाकिस्तान मैत्री
आग्रा शिखर बैठकीच्या वेळी २००१ मध्ये मुशर्रफ चर्चेला आले होते त्या वेळी काश्मीर प्रश्न वाजपेयींनी जवळपास सोडवला होता, पण काही नतद्रष्टांनी त्यात ऐनवेळी अडथळे आणून तो प्रयत्न हाणून पाडला. आग्नेय आशियात शांतता नांदावी. शेजारी देशात शांतता नांदावी यासाठी ते प्रयत्नशील होते. १९९९ मध्ये त्यांनी लाहोर बससेवा सुरू केली. कारगिल आक्रमणाच्या वेळी ते पंतप्रधान होते व त्यांनी खंबीरपणे ते आक्रमण निपटून काढले. पाकिस्तानशी संबंध सुधारणे हे त्यांचे स्वप्न होते. मोरारजी देसाई सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असतानाच त्यांनी त्याची बीजे सत्तरच्या दशकात रोवली होती.
संघाचा मुखवटा
अटलबिहारी वाजपेयी हे मवाळ नेते होते तरीही संघाचा छुपा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असे व त्यांच्या गूढ हास्यातच त्यांचे हिंदू गटांशी असलेले संबंध विरोधकांना जाणवत असत असे म्हणतात. ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेली त्या वेळी ते विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी ते धर्मनिरपेक्ष राहिले. त्यांनी बाबरी हल्ल्याचा निषेध केला. गुजरात दंगलीच्या वेळी त्या वेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म निभावण्यास सांगणारे वाजपेयीच होते हे सर्व जण विसरून जातात.
१३ दिवसांचा पंतप्रधान
जोखीम घेण्यात ते मागे नव्हते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. अद्रमुकच्या जयललिता यांनी पाठिंबा काढल्याने त्यांचे सरकार पडले. ते १९९९ मध्ये पुन्हा निवडून आले. मग मात्र त्यांनी आघाडी सरकारचे रिंगमास्टर म्हणून नावलौकिक मिळवला. आघाडी सरकार स्थिरपणे चालवले. आघाडी सरकारची काही बंधने असतात त्यामुळे त्यांनी राममंदिर, काश्मीर हे प्रश्न मागे ठेवले.
पोखरण अणुचाचण्या
इंदिराजींनी पहिल्या अणुचाचण्या केल्या. त्यानंतर मे १९९८ मध्ये वाजपेयी यांनी पोखरण येथे अणुचाचण्या करून जगात भारताचा धाक निर्माण केला. अण्वस्त्रांनी इतर देशांना भीती वाटू शकते हे त्यांना माहीत होते.
कवी
वाजपेयी पंतप्रधान, वक्ते, राजकारणी, मुत्सद्दी तर आहेत, पण ते हळुवार मनाचे कवी आहेत. एकदा त्यांनी केरळात कुमारकोमला जाऊन आत्मचिंतनात्मक लेखन केले. मेरी ‘इक्यावन्न कविताएँ’ हा कवितासंग्रहही त्यांनी लिहिला. ते रसिकही होते. त्यांना साहित्य, काव्य यात रस होता.
रा. स्व. संघाशी संबंध
किशोरवयीन काळापासून स्वातंत्र्यलढय़ात ते तुरुंगात गेले व काही काळ त्यांनी कम्युनिझमशी मैत्री केली, पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले व जनसंघात त्यांनी काम केले. संघाच्या मासिकासाठी त्यांनी १९५० मध्ये शाळा सोडली व नंतर त्यांची राजकीय मुळे संघात पक्की झाली.
राजकारणाचा श्रीगणेशा
१९४२-१९४५ या काळात ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी श्रीगणेशा केला. प्रथम ते कम्युनिस्ट होते व नंतर हिंदू राष्ट्रवादाकडे वळले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते अनुयायी होते. मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. मुखर्जी यांनी १९५३ मध्ये काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवान्याची अट ठेवण्याच्या विरोधात उपोषण केले, त्याला वाजपेयी यांनी पाठिंबा दिला. मुखर्जी यांच्याकडून त्यांनी धुरा खांद्यावर घेतली. १९५७ मध्ये ते जनसंघाचे खासदार झाले. त्यांनी हा पक्ष वाढवला व विरोधी पक्षातील एक दखल घेण्याजोगा नेता म्हणून नाव कमावले. त्यांना सर्वाचा आदर, सन्मान, मान्यता मिळाली. राष्ट्रीय सांस्कृतिक चळवळीने त्यांना स्वीकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा