सर्वशक्तिमान महासत्ता असे बिरुद मिरवत जागतिक राजकारणात प्रभावशाली असणाऱ्या अमेरिकेवर एका प्रमुख शहराची पालिका दिवाळखोरीत काढण्याची नामुष्की ओढावली आहे. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील डेट्रॉइट या शहराच्या नगरपालिकेवर ही आर्थिक आपत्ती ओढावली आहे. या शहराचे आपत्कालीन व्यवस्थापक केविन ऑर यांनी गुरुवारी या दिवाळखोरीचा प्रस्ताव ठेवला असून प्रांतीय न्यायाधीशांनी त्यावर मोहर उमटविल्यास ही पालिका दिवाळखोरीत निघेल. अर्थात, येत्या वर्षभरात डेट्रॉइट या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास ऑर तसेच काही उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत या पालिकेचा आर्थिक डोलारा पूर्णपणे कोसळल्याने तिच्यावर तब्बल साडेअठरा अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अन्य देशांत अथवा शहरात जे उपाय केले जातात, तेच उपाय डेट्रॉइटमध्येही करण्यात आले. मात्र, कामगार कपात, कर वाढविणे हे उपायही या पालिकेला तारू शकले नाहीत. अनुत्पादित लोकसंख्या हेही या आर्थिक दुरवस्थेचे प्रमुख कारण आहे. १९५० च्या आसपास या शहराची भरभराट होत होती, तेव्हा तिची लोकसंख्या साधारण १८ लाख होती, यात कामगारवर्गाचे प्रमाण अधिक होते. मात्र कालांतराने येथून अन्यत्र स्थलांतर करण्याचे सत्र सुरू झाल्याने सध्या या शहराची लोकसंख्या केवळ ७० हजार आहे. यात निवृत्त नागरिक अधिक असल्याने त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला.
या शहराचे खर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत असून उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा आकडा किती तरी पटीने जास्त आहे. येथील पायाभूत सुविधाही कोलमडल्या आहेत, त्यामुळे या पालिकेची दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता, असे मिशिगनचे राज्यपाल रिक स्निडर यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊसनेही याविषयी निवेदन प्रसृत केले आहे. डेट्रॉइटमधील घडामोडींकडे आमचे बारीक लक्ष असून त्याच्या पुनर्बाधणीसाठी आम्ही त्यांच्यासोबतच आहोत, असे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
या दिवाळखोरीच्या प्रस्तावाला न्यायाधीशांनी हिरवा कंदील दाखविला तर या शहरात कोटय़वधींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळेच या दिवाळखोरीला उद्योजकांकडून न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
लोकशाहीतील शस्त्रागार
अमेरिकेतील सर्वात मोठे वाहन उत्पादक शहर अशी ओळख असणाऱ्या या शहरात जनरल मोटर्स, फोर्ड मोटर कंपनी असे कारखाने आहेत. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने केलेल्या बेसुमार शस्त्रनिर्मितीपैकी बव्हंशी शस्त्रे येथेच उत्पादित झाली होती. या शहराचा पुढे ‘लोकशाहीतील शस्त्रागार’ असा गौरव झाला. डेट्रॉइट हे आमचे घरच आहे. ते नव्याने उभे राहील. ही दिवाळखोरी म्हणजे इष्टापत्ती ठरो, अशी प्रतिक्रिया जनरल मोटर्सने व्यक्त केली आहे.
वाढती गुन्हेगारी
डेट्रॉइट आणि वर्णसंघर्ष याचेही जुने नाते आहे. गेल्या दशकभरात हजारो गौरवर्णीय नागरिक जवळच्या प्रांतात स्थलांतरित झाल्याने या शहराची सध्याची लोकसंख्या केवळ ७० हजार उरली आहे. चोऱ्या, दरोडे, हत्या हे प्रकार दररोज होत असून वर्षांकाठी सुमारे पाच हजार इमारतींना आग लावण्याचे विचित्र प्रकारही येथे घडतात. त्यातच कपातीच्या धोरणामुळे पोलिसांचे बळही कमी झाले आहे.