म्हैसुरू येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेची कामगिरी
आपल्या देशात दुधात भेसळीचे प्रमाण खूपच जास्त असून त्यातील दोन तृतीयांश दूध हे अन्न सुरक्षेचे मानक पूर्ण करीत नाही. २०१५ मध्ये आरोग्य मंत्रालयाने जे नमुने तपासले होते त्यातील सहा टक्के नमुन्यात अपमार्जकांची (डिर्टजट)भेसळ आढळून आली होती. त्यामुळे कृत्रिम दूध हा आपल्या देशातील एक मोठा प्रश्न आहे. दैनंदिन आयुष्यात आपण कधी दूध तपासण्याच्या भानगडीत पडत नाही व तशी सोपी साधने उपलब्ध नाहीत, पण आता म्हैसुरू येथील संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेने दुधातील भेसळ ओळखण्याचा एक संच तयार केला आहे. त्यामुळे दुधात भेसळ केलेले सहा रासायनिक पदार्थ काही मिनिटात ओळखता येतात. ही प्रयोगशाळा संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या अखत्यारीत काम करते. उत्तर भारतात सणाच्यावेळी दूधभेसळ होते. कृत्रिम दूध विकले जाते, ते दुधासारखेच दिसते. रोजची वॉशिंग पावडर व रिफाइन्ड तेल वापरून हे दूध तयार करतात.त्यात पाण्याचाही वापर असतो. महाराष्ट्रातही दूध भेसळ मोठय़ा प्रमाणात आहे पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
अटल इनोव्हेशन मिशनमध्ये दूध भेसळ तीन मिनिटात ओळखण्यासाठी अवघा चार रूपये खर्च असलेली सुविधा असावी, हे आव्हान नीती आयोगानेही स्वीकारले आहे. सीएसआयआरने यापूर्वी दूध भेसळ ओळखण्यासाठी क्षीर स्कॅनर तायर केले असून त्यामुळे पन्नास पैशात अवघ्या ४०-४५ सेकंदात दुधातील भेसळ ओळखता येते. संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेचे वैज्ञानिक एम.सी.पांडे यांनी सांगितले की, सणाच्या वेळी दुधातील भेसळ वाढत असते कारण दुधाचे उत्पादन सणाच्या वेळी वाढत नाही. आमच्या संस्थेने दूध भेसळ ओळखण्याचा जो संच विकसित केला आहे त्यात काही रसायनांचा वापर केला आहे. जर दुधात अपमार्जके म्हणजे डिर्टजट असतील तर त्या संचातील कागदाची पट्टी दुधात बुडवली तर हिरवी, पिवळी किंवा निळी होते, त्यावरून कुठली रसायने आहेत तेही कळते. ०.५ टक्क्यांपर्यंत भेसळ त्यात कळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा