हिमाचल प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या ठिकाणी जनतेला आकर्षित करण्यासाठी भाजपकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. तर काँग्रेसवर टीकेचे ताशेरे ओढले जात आहेत. सोमवारी झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Congress ki jahan bhi hukumat hoti hai, vikas kho jaata hai: HM Rajnath Singh at Kunihar #HimachalElections2017 pic.twitter.com/WHWxzzFTJM
— ANI (@ANI) November 6, 2017
देशातील ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथून विकास हरवला आहे, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. हिमाचल प्रदेशातील कुनिहारमध्ये रॅली झाली त्यावेळी त्यांनी ही टीका केली. इतकेच नाही तर जे सरकार माता-बहिणींचे रक्षण करू शकत नाही, त्यांना सत्तेवर अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपने आजवर कधीच जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे राजकारण केले नाही. मात्र, काँग्रेसने कायम जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली, असेही सिंह यांनी म्हटले. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले.
फक्त भाजपचे सरकार आहे तिथेच विकास होतो, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तिथे विकास हरवून गेला आहे. राजनाथ सिंह यांच्या सभेला खूप मोठी गर्दी जमली होती. ही गर्दी पाहतात हिमाचल प्रदेशातील जनता काँग्रेसला नाकारणार, हे स्पष्टपणे दिसत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशात भाजपचे सरकार आहे आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे. पण आम्ही कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.