पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंधांचा विकास ‘परस्पर हित’ आणि परस्पर संवेदनशीलतेवर आधारित आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे मालदीवचे समकक्ष मुसा जमीर यांच्याशी केलेल्या संभाषणात सांगितले.
सहा महिन्यांपूर्वी चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मालदीवच्या पहिल्या उच्चस्तरीय भेटीचा एक भाग म्हणून जमीर दिल्लीत आले आहेत. जमीर यांच्याबरोबरच्या संभाषणाची सुरुवात करताना जयशंकर म्हणाले, ‘जवळचे आणि निकटचे शेजारी असल्याने, आमच्या संबंधांची वाढ स्पष्टपणे परस्पर हितसंबंध आणि परस्पर संवेदनशीलतेवर आधारित आहे.’ ते म्हणाले, ‘जोपर्यंत भारताचा संबंध आहे, हे आमच्या नेबरहुड फर्स्ट धोरण आणि सागर (सिक्युरिटी अॅन्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) दृष्टिकोनातून व्यक्त केले आहे. मला आशा आहे की आजच्या बैठकीत आम्ही विविध क्षेत्रात आमचे दृष्टिकोन मजबूत करू शकू.’ मोइझ्झू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना माघारी घेण्यास सांगितले होते. ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये गंभीर तणाव निर्माण झाला होता.
जयशंकर म्हणाले, ‘मालदीवला विकासासाठी मदत करणाऱ्या प्रमुख देशांपैकी भारत एक आहे. आमच्या प्रकल्पांमुळे तुमच्या देशातील लोकांना फायदा झाला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांपासून ते वैद्याकीय स्थलांतर आणि आरोग्य केंद्रांपर्यंतचा समावेश आहे.’ ते म्हणाले, ‘आम्ही याआधीही अनुकूल अटींवर आर्थिक मदत केली आहे. मालदीवला अनेक प्रसंगी पाठिंबा देणारा भारत हा पहिला देश आहे,’ असे जयशंकर म्हणाले.