मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. राम मंदिराच्या निर्माणाची पाहणीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर हनुमान गढी येथे देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर धन्य झालो. राम मंदिराचे निर्माण होत असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो. तसेच, देशात फक्त रामराज्यच चालणार आणि रामाला मानणारेच देशावर राज्य करणार आहेत.”
हेही वाचा : “सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येत, तर आमची…”, शरद पवारांचे नाशिकमध्ये विधान
“राम भक्त एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. जे रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जन्माचे पुरावे मागत होते, ते घरी बसले आहेत. आता महाराष्ट्रात रामाला मानणारे सरकार स्थापन झाले आहे. ही रामाची आणि हनुमानाची महिमा आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदेंकडून बंडाचा प्रयत्न? राऊतांचा मोठा दावा; नेमकं काय म्हणाले
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हनुमान चालीसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे तोंड उघडले नाही. आम्ही साधूंचे रक्षण करणारे आहोत. महाराष्ट्रात प्रभू रामांच्या आशीर्वादाने बनलले सरकार काम करणार आहे, असा विश्वास देतो,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.