New Parliament Building Inauguration by PM Modi: देशभरात सध्या संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचं बांधकाम पूर्ण झालं असून येत्या २८ मे रोजी अर्थात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन केलं जात आहे. यासंदर्भात विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं, अशी मागणी करत विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रपती देशाच्या घटनात्मक प्रमुख असून संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हायला हवं, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, अशी मागणी करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीसांनी याआधी अनेक प्रसंगी राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना डावलून घटनात्मक संस्थांच्या इमारतीच्या बांधकामांची उद्घाटनं किंवा भूमीपूजन नेतेमंडळींनी केल्याची उदाहरणं दिली.
“…एवढी वाईट वेळ अजून आमच्यावर आली नाही”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत संजय राऊतांचं टीकास्र!
“जेव्हा ते करतात तेव्हा ते लोकशाहीला धरून असतं आणि पंतप्रधान मोदी जेव्हा उद्घाटन करतात तेव्हा बहिष्कार करणं हा दुटप्पीपणा आहे. हे लोकशाहीविरोधी आहे. यांना देशाशी, संविधानाशी, लोकशाहीशी देणंघेणं नाहीये. हे फक्त खुर्चीसाठी राजकारण करणारे लोक आहेत. त्यांचा मी निषेध करतो”, असं फडणवीस म्हणाले. “विरोधक खुर्चीचे व्यापारी आहेत. यांना सत्ता आणि खुर्चीची लालसा एवढी आहे, की त्यासाठी हे सगळे एकत्र येतात. त्यांना हे माहिती आहे की मोदींचा ते सामना करू शकत नाहीत. त्यांच्याकडे ना नेता आहे, ना नीती आहे ना नियत आहे. त्यामुळे ते सगळे एकत्र येऊन असं समजतात की ते मोदींना बदनाम करतील आणि सत्तेची खुर्ची परत मिळवतील. पण यांचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये”, असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी दिली यादी!
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस किंवा देशातील इतर राज्यांत विरोधी पक्षांच्या कार्यकाळात झालेल्या अशाच घडामोडींची यादी दिली. “मी विरोधकांना विचारेन, की इंदिरा गांधींनी संसदेच्या अॅनेक्स इमारतीचं उद्घाटन केलं, तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही टाकला? इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का नाही केलं? राजीव गांधींनी संसदेच्या ग्रंथालयाचं उद्घाटन केलं तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का आली नाही? तमिळनाडूच्या विधानसभेचं उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते, सोनिया गांधी होत्या. नितिश कुमारांनी बिहारच्या सेंट्रल हॉलचं उद्घाटन केलं. तेव्हा जेडायुनं बहिष्कार का नाही टाकला?” असे सवाल फडणवीसांनी केले.
केजरीवाल, ममता बॅनर्जी, गोगोई.. फडणवीसांनी सांगितली उदाहरणं!
“यूपीएचं सरकार असताना मणिपूरच्या इम्फाळमध्ये मनमोहन सिंह आणि सोनिया गांधींनी तिथल्या विधानभवनाचं उद्घाटन केलं. तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आलं नाही? तरुण गोगोईंनी २०१४ साली आसामच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं. राज्यपालांना निमंत्रितही केलं नाही. २०१४मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं. राज्यपालांना निमंत्रितही केलं नाही. २०१८मध्ये आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं. ते राज्यपालांच्या हस्ते का केलं नाही? २०२०मध्ये तर सोनिया गांधींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचं भूमीपूजन केलं. त्या तर कोणत्या संवैधानिक पदावरच नव्हत्या. त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. ममता बॅनर्जींनी त्यांच्या ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगचं उद्घाटन केलं. राज्यपालांना निमंत्रण दिलं नाही. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रीसर्च सेंटरचं उद्घाटन केलं. उपराज्यपालांना निमंत्रण दिलं नाही”, अशा सर्व घटना फडणवीसांनी सांगितल्या.
“गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ…” संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
“रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार झालंय. आत्ताचा संसद भवन कौन्सिल हॉल होता. पहिल्यांदा देशात पूर्ण संसद भवन तयार करण्यात आलं आहे. त्याचं उद्घाटन जर मोदी करतायत, तर मग त्याच्यावर अशा प्रकारचा बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. मोदींचा मुकाबला करू शकत नाहीत म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा सवाल आहे, एवढी उदाहरणं मी दिली, त्याचं आधी उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक आहेत”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.