लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात श्रीकांत शिंदे यांची तक्रार केली. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्याचसोबत निवडणुकीत भाजपाचा विजय झाला, तर संविधान धोक्यात येईल, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
संजय राऊतांचं पत्र आणि फडणवीसांची टीका
संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून श्रीकांत शिंदेंच्या संस्थेत सामाजिक कार्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये चौकशी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली. “कोण संजय राऊत? तुम्ही दर्जा असणाऱ्या लोकांबद्दल प्रश्न विचारा. माझा स्तर पाहून तरी प्रश्न विचारा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी जिंकले तर संविधान धोक्यात? फडणवीस म्हणतात..
दरम्यान, संविधान धोक्यात आल्याच्या विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उत्तर दिलं. “गेल्या १० वर्षांपासून मोदींकडे पूर्ण बहुमत आहे. पण त्यांनी संविधानाचं रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचारही केला नाही.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय की संविधानाची मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा जुमला आहे. जेव्हा विकास, जनहिताचं काम करता येत नाही, विश्वासार्हता संपलेली असते तेव्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं फडणवीस म्हणले.
दिवंगत इंदिरा गांधींवर टीका
यावेळी फडणवीसांनी देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. “संविधान धोक्यात येणार हा दावा करणं मूर्खपणाचं आहे. भारताच्या रक्तात लोकशाही आहे. भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता. त्यांनी विरोधी पक्षांच्या लाखो नेते-कार्यकर्त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवलं. त्यानंतरही त्यांना भारतातली लोकशाही संपवता आली नाही. भारतातली लोकशाही कुणीच संपवू शकत नाही”, असं फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींना टोला
राहुल गांधीनाही देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत लक्ष्य केलं. ‘सत्तेत आल्यास अग्नीवीर योजना रद्द करू’, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, “माझं काँग्रेसला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. काँग्रेसनं छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, कर्नाटक या कुठल्याच ठिकाणी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे त्यांना माहिती आहे की ते निवडूनच येणार नाहीत. त्यामुळे उद्या राहुल गांधी हे आश्वासनही देऊ शकतील की प्रत्येक नागरिकाला मी एक ताज महाल बांधून देईन”, असा टोला फडणवीसांनी लगावला.