Lucknow Chandrika Devi Mandir Viral VIDEO : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध चंद्रिका देवी मंदिर परिसरात दुकानदारांनी भाविकांना अमानुषपणे मारहाण केली आहे. या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. दुकानदार भाविकांना चामड्याच्या पट्ट्याने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. दुकानदारांनी महिलांना देखील अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंद्रिका देवी मंदिरात दुकानदार व भाविकांमध्ये प्रसादावरून भांडण झालं होतं. भाविकांनी प्रसाद खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे दुकानदार संतापले आणि त्यांनी भाविकांना चामड्याचा पट्टा, काठीसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुकानदारांच्या या कृत्यामुळे मंदिर परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.

दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ हाती आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या घटनेशी संबंधित सीसीसीटीव्ही फूटेज देखील ताब्यात घेतलं आहे. या फूटेजच्या आधारावर ते अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. पीडित भाविकांनी दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.