जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून ९ जण ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शिव खोरी मंदिर येथून हे यात्रेकरू कटरा या ठिकाणी जात होते. या घटनेत ३३ जण जखमी झाले.
काय घडली घटना?
एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या शपथविधीची दिल्लीत तयारी सुरू असताना रविवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमाराला भाविकांच्या बसवर गोळीबार झाला. रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितले की, पौनी भागाजवळ तिर्यथ गावाजळ झालेल्या या हल्ल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस खोल दरीत कोसळली. बचावकार्य पूर्ण झाले असून नऊ मृतदेह हाती आले आहेत. मृतांची ओळख पटलेली नाही, मात्र प्राथमिक माहितीवरून ते सर्वजण उत्तर प्रदेशातील असल्याची शक्यता आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका हल्लेखोराने चेहरा झाकून घेतला होता आणि त्याने बसवर गोळीबार केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यातील एका प्रत्यक्षदर्शीने त्याचा अनुभव सांगितला आहे.
हे पण वाचा- दहशतवादी हल्ल्यात नऊ जण ठार; गोळीबारानंतर वैष्णोदेवी यात्रेकरूंची बस दरीत कोसळून अपघात
प्रत्यक्षदर्शी जखमी प्रवाशाने काय सांगितले?
बसमध्ये बसलेले बहुतांश लोक हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. आम्ही माता वैष्णो देवीचं दर्शन करायला गेलो होतो. तिथून परतत असताना पाच किमी गाडी पुढे आली होती. घाटातून वाट काढत असतानाच आमच्या बसवर गोळीबार सुरु झाला. त्यानंतर बस दरीत पडली. आमच्या बस चालकाला गोळी लागली. काही लोकांनाही गोळ्या लागल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. या घटनेमुळे सगळेच घाबरले होते. चालकाला गोळी लागली आणि इतरांनाही गोळ्या लागल्या, असंही या प्रवाशाने एएनआयला सांगितलं.
SSP मोहिता शर्मा काय म्हणाल्या?
रविवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. त्यावेळी चालकाला गोळी लागल्याने त्याचा बसवरचा ताबा सुटला आणि बस दरीत पडली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तर ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा जो भाग आहे ही जागा बऱ्याच उंचावर आहे. शिवखोडी या ठिकाणाहून बस येत होती त्यावेळी हल्ला झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दोन अतिरेक्यांना पाहिल्याचं सांगितलं. आम्ही आता सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे असं मोहिता शर्मा यांनी ANI ला सांगितलं.