Parliament Winter Session 2023 Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (१३ डिसेंबर) १० वा दिवस आहे. आज लोकसभेत शून्य प्रहरात खासदार बोलत असताना एक अनुचित प्रकार घडला. दोन तरुण लोकसभेत शिरले आणि त्यांनी लोकसभेत पिवळ्या धुराचे लोट पसरवले. यानंतर लोकसभेत एकच खळबळ उडाली. काही खासदारांनी हिंमतीने पुढे येऊन दोन्ही तरुणांना पकडलं. दोघांनाही चोप देऊन सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. दिल्ली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या चौकशी चालू आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून हे दोघे सभागृहापर्यंत कसे पोहोचले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, दोन तरुणांचा सभागृहात राडा सुरू असताना एक तरुण आणि एका महिलेने संसदेबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनीदेखील आत राडा करणाऱ्या तरुणांप्रमाणे संसदेबाहेर स्मोक कॅनद्वारे पिवळा धूर पसरवला. या चारही जणांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या चौघांची ओळख पटली आहे. संसदेत राडा करणाऱ्या दोन तरुणांची नावं सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यापैकी अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला रहिवासी आहे, तर नीलम ही मूळची हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील घासो गावातली रहिवासी आहे. डी. मनोरंजन हा कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातला रहिवासी असून तो ऑटोरिक्षा चालवण्याचं काम करतो. तसेच सागर शर्मा हा उत्तर प्रदेशमधील लखनौचा रहिवासी आहे.
हे ही वाचा >> संसदेतल्या राड्याचे महाराष्ट्रात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; म्हणाले, “आजपासून प्रत्येक आमदाराला…”
दरम्यान, डी. मनोरंजन याचे वडील देवराज यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संसदेतल्या घटनेप्रकरणी देवराज म्हणाले, “हे चुकीचं आहे. कोणीही असं कृत्य करू नये.” तसेच त्यांच्या कृत्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, माझ्या मुलाने काही चांगलं काम केलं असेल तर मी नक्कीच त्याला पाठिंबा देईन, पण त्याने जर काही चुकीचं केलं असेल तर मी त्याचा निषेध करतो. त्याने समाजासाठी काही चुकीचं केलं असेल तर त्याला फाशी द्या”