मोलकरणीला अमेरिकेतील नियमांप्रमाणे वेतन न दिल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरवले. मात्र, भारताने खोब्रागडे यांना राजनैतिक संरक्षण दिले असल्याने त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यांच्यावरील खटला कायम ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या या भूमिकेविरोधात भारतानेही आक्रमक पवित्रा घेत अमेरिकी दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले. संगीता रिचर्डच्या कुटुंबाला अमेरिकेला पाठवण्यात याच अधिकाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मोलकरीण संगीता रिचर्ड हिच्या पगाराच्या मुद्दय़ावरून देवयानी यांना गेल्या वर्षी १२ डिसेंबरला न्यूयॉर्क पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हापासून भारत आणि अमेरिका यांच्यात या मुद्दय़ावरून बेबनाव निर्माण झाला आहे. देवयानी यांना राजनैतिक अधिकाऱ्याला असलेले विशेषाधिकार बहाल केल्याने त्यांना अमेरिकेने देश सोडून जाण्याचे आदेश दिले. त्या शुक्रवारी मायदेशी येण्यासाठी रवाना झाल्या. अमेरिकेच्या या कृतीला उत्तर म्हणून भारतानेही शुक्रवारी येथील अमेरिकी दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याला येत्या ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले. या अधिकाऱ्याचे नाव समजू शकले नसले तरी संगीता रिचर्डचा पती व मुलांना अमेरिकेत पाठवण्यात त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावली होती. संगीताचे कुटुंबीय अमेरिकेत आल्यानंतरच देवयानी यांच्यावर एकतर्फी कारवाई झाली.
‘‘मी निर्दोष असून भरारा यांनी केलेले आरोप निराधार आहेत. न्यायालयात ते खोटे सिद्ध होतील. मी माझे निर्दोषत्व सिद्ध करून दाखवीन.’’, असे प्रतिपादन देवयानी खोब्रागडे यांनी केले.
तर, ‘खोब्रागडे यांनी एकही चुकीचे विधान केलेले नाही व मोलकरणीला नियमानुसार वेतन दिले आहे. त्या मोलकरणीने लघुमुदतीच्या करारावर येथे येण्याचे मान्य केले होते, त्यानुसार रोजगार कालावधी संपल्यानंतर तिने भारतात परत जाणे आवश्यक होते’, अशी प्रतिक्रिया देवयानींचे वकील डॅनियल अरश्ॉकयांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा