सॅमसंग नोट ७ मध्ये चार्जिंग दरम्यान स्फोट झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात हवाई प्रवासादरम्यान सॅमसंग नोट ७ वर निर्बंध घालण्यात आलेत. हवाई वाहतूक संचालनालयाने यासंदर्भात लेखी परिपत्रक काढून याविषयीची माहिती दिली आहे. चेक इन लगेजमध्ये नोट ७ नेण्यास बंदी असल्याचे यात म्हटले आहे.
हवाई वाहतूक संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार चेक इन लगेजमध्ये सॅमसंग नोट ७ नेण्यावर बंदी असेल. मात्र हँडबॅगमध्ये (प्रवासादरम्यान स्वतःजवळ ठेवता येणारी छोटी बॅग, पर्स) नोट ७ ठेवता येईल. मात्र संपूर्ण प्रवासादरम्यान मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक असेल असे हवाई वाहतूक संचालनालयाचे प्रमुख बी एस भुल्लर यांनी सांगितले. या नियमाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.
अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ऍडमिनीस्ट्रेशनने काही दिवसांपूर्वी सॅमसंग नोट ७ वर निर्बंध घातले होते. नोट ७ मध्ये स्फोट होण्याच्या घटनांमुळे हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले होते. विमान प्रवासादरम्यान हा फोन ऑन करु नये किंवा चार्जिंगला ठेऊ नये असेही निर्देश देण्यात आले होते. ऑगस्टमध्ये सॅमसंगने थाटामाटात गॅलेक्सी नोट ७ फोन बाजारात आणला होता. जगभरात चार्जिंग दरम्यान नोट ७ मध्ये स्फोट झाल्याच्या ३५ तक्रारी आल्या होत्या. यानंतर सॅमसंगने सुमारे २५ लाख फोन्स बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. आयफोन ७ लाँच झाला असतानाच नोट ७च्या सदोष बॅटरीमुळे सॅमसंगला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
बाजारपेठेतील सदोष बॅट-यांचा तपास करत आहोत. पण ग्राहक महत्त्वाचा असल्याने आम्ही नोट ७ ची विक्री थांबवत आहोत असे सॅमसंगने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. ज्या लोकांनी नोट ७ विकत घेतला आहे. त्यांना आगामी काळात नवीन फोन दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. आम्ही ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास कटीबद्ध आहोत असेही कंपनीच्या अधिका-यांनी नमूद केले होते. आता हवाई प्रवासादरम्यान जगभरात नोट ७ च्या वापरावर निर्बंध घातले जात असल्याने सॅमसंगची चांगलीच नाचक्की झाली आहे.