नवी दिल्ली :सूचनेनंतरही विमानात मुखपट्टी वापण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाला उड्डाणापूर्वी खाली उतरवा, अशी सूचना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना बुधवारी केली.

विमानतळ आणि प्रवासात मुखपट्टी आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने ३ जूूनला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला दिले होते. यावेळी अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार वैमानिक, हवाई सेविकांसह विमान कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. अशा व्यक्तींवर विमान प्रवासास बंदी करण्याचीही सूचना केली होती. त्यानुसार डीजीसीएने परिपत्रक प्रसृत केले आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विमातनळ संचालकांनी आवश्यकता असल्यास स्थानिक पोलीस आणि सुरक्षा विभागाची मदत घेण्याची सूचना करण्यात आली.

विमान प्रवाशांनी योग्य प्रकारे मुखपट्टीचा वापर करावा. अत्यंत गरजेच्या वेळीच मुखपट्टी काढता येईल. या संबंधी विमान कंपन्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे डीजीसीएने पत्रकात नमूद केले आहे. एखाद्या प्रवाशाला अतिरक्त मुखपट्टीची आवश्यकता असेल तर त्याला विमान कंपन्यांनी ती द्यावी, अशी सूचनाही केली आहे. प्रवाशाला वारंवार सूचना दिल्यानंतरही तो करोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याला उड्डाणापूर्वी विमानातून उतरवा, असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.  वारंवार सूचना केल्यानंतरही एखादा प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर विमान कंपन्यांना त्याला डीजीसीएच्या नियमानुसार ‘अनियंत्रित प्रवासी’ म्हणून समजण्यात यावे. त्यानंतर त्याला विशिष्ट कालावधीसाठी प्रवासबंदी करण्याचा अधिकार आहे.

संबंधित राज्यांच्या नियमानुसार कारवाई

देशातील सर्व विमानतळ संचालकांनी विमानतळांवर प्रवासी मुखपट्टी योग्य प्रकारे वापरतात किंवा नाही, याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच कोविड नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याबाबत पाहणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर संबंधित राज्यांच्या कायद्यानुसार करवाई करण्याची सूचनाही डीजीसीएने केली.

Story img Loader