मागील काही दिवसांपासून भारतीय विमान कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अलीकडेच एका प्रवाशाने विमानातून प्रवास करताना महिलेच्या अंगावर लघुशंका केली. ही घटना ताजी असताना एअर इंडियाच्या विमानात इतरही काही गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी ‘एअर इंडिया’ला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
पॅरिस-नवी दिल्ली विमानात प्रवाशांनी केलेल्या गैरवर्तनाच्या दोन घटनांबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ‘एअर इंडिया’च्या विमानात या लज्जास्पद घटना घडल्या होत्या. पॅरिसहून नवी दिल्लीला आलेल्या या विमानात एक प्रवासी शौचालयात धूम्रपान करत असल्याचे आढळून आले. तो विमानातील कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालत होता.
दुसऱ्या घटनेत एक महिला प्रवासी शौचालयात गेली असता तिच्या शेजारच्या प्रवाशाने तिच्या रिकाम्या सीटवर आराम केला आणि तिच्या ब्लँकेटचाही वापर केला, अशी तक्रार करण्यात आली आहे. या दोन्ही घटना ६ डिसेंबर २०२२ रोजी घडल्या आहेत. या दोनही घटनांची माहिती ‘एअर इंडिया’ने ‘डीजीसीए’ला दिली नव्हती. ५ जानेवारी रोजी ‘डीजीसीए’ने या घटनांचा अहवाल मागितला. एअर इंडियाने ६ जानेवारीला ई-मेलद्वारे याचे उत्तर दिले.
हेही वाचा- विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कंपनीचा दणका, केली मोठी कारवाई
प्रथमदर्शनी असे दिसून येते की अनियंत्रित प्रवाशाच्या हाताळणीशी संबंधित तरतुदी आहेत. प्रवाशांनी नियमांचे पालन केले नाही. मात्र एअर इंडियाचा प्रतिसादही अपुरा आणि विलंबित होता, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. ‘डीजीसीए’ने एअर इंडियाच्या जबाबदार व्यवस्थापकांना त्याबाबत जबाबदार धरले असून नियामक कर्तव्याचे पालन न केल्याबद्दल कारवाई का केली जाऊ नये? यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर दोन आठवड्यात उत्तर मागवलं आहे.