Ramachandra Rao On Ranya Rao : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. अभिनेत्रीची झडती घेतल्यानंतर तिच्याकडून १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती सांगितली जाते. या सर्व प्रकारामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली. अभिनेत्री रान्या राव ही १५ दिवसांतून चार वेळा दुबईला ये-जा करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना संशय आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री रान्या राववर कारवाई करत तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रान्याला अटक केली. अटकेनंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आलं, याठिकाणी अभिनेत्रीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रान्या राव हिचे सावत्र वडील रामचंद्र राव हे कर्नाटकात आयपीएस अधिकारी आहेत. रामचंद्र राव हे सध्या कर्नाटक राज्य, पोलीस गृहनिर्माण महामंडळात पोलीस महासंचालक (डीजीपी) पदावर कार्यरत आहेत.

दरम्यान, जवळपास १२ कोटींच्या सोन्यासह रान्या राव हिला अटक केल्यानंतर सावत्र वडील रामचंद्र राव यांनी प्रतिक्रिया दिली. ही धक्कादायक बाब असून आपल्याला यापैकी कशाचीही माहिती नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. डीजीपी रामचंद्र राव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “माध्यमांद्वारे जेव्हा अशी घटना माझ्या निदर्शनास आली तेव्हा मलाही धक्का बसला. मला यापैकी कोणत्याही गोष्टीची माहिती नव्हती. हे सर्व ऐकूण मलाही इतर कोणत्याही वडिलांप्रमाणे धक्का बसला”, असं राव यांनी म्हटलं.

तसेच अभिनेत्री रान्या राव ही आपल्याबरोबर राहत नसून ती वेगळी राहत असल्याचंही डीजीपी रामचंद्र राव यांनी स्पष्ट केलं. “काही कौटुंबिक समस्यांच्या कारणास्तव ती वेगळी राहते. पण असो, कायदा कायद्याचं काम करेल. माझ्या करिअरमध्ये एकही काळी खूण नाही. मला या घटनेबाबत आता अधिक काही बोलायचं नाही”, असं डीजीपी रामचंद्र राव यांनी म्हटलं.

दरम्यान, रान्या राव हिला या सोन्याच्या तस्करी प्रकरणात एकटी होती की, दुबई-भारतादरम्यान कार्यरत असलेल्या मोठ्या तस्करी टोळीचा भाग होती, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्यानंतर ही अभिनेत्री त्यांच्या रडारवर आली. सोमवारी भारतात परतल्यावर तिची चौकशी करून, ही कारवाई सुरू करण्यात आली.

रान्या राव कोण आहे?

३३ वर्षीय रान्या राव ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कन्नड आणि तामिळ भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदुस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील के रामचंद्र राव हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते कर्नाटक राज्य पोलिस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रान्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलूर या गावात झाला. तिने आपलं प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षण बेंगळुरूमधून पूर्ण केलं. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी रान्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं. २०१४ मध्ये रान्या रावने ‘मानिक्य’ या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीपबरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला, ज्यामुळे अत्यंत कमी वेळात तिला मोठी लोकप्रियता मिळाली.