चंद्रकांत पाटील यांचा इशारा
खासदार धनंजय महाडिक यांनी आमची मैत्री पाहिली, आता दुश्मनी पाहू नये, असा सज्जड इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यतील भुदरगड येथे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे मंत्री पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. महाडिक — पाटील स्नेहाची चर्चा लोकसभा निवडणूक काळातही सुरु आहे. उभयतांच्या मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील हे महाडिक यांना छुप्या पद्धतीने मदत करतील असा संभ्रम जिल्ह्यत पसरवला जात आहे.
समाजमाध्यमातून तशी चर्चा घडवली जात आहे. त्यातून पाटील यांच्या निष्ठेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी ओबडधोबड दिसतो म्हणून मला काही समजत नाही असे समजू नका. जाड भिंगाच्या काचांमधून माझ्या डोळ्यात काय आणि डोक्यात काय चालले, याचा अंदाज कधीच कोणाला येणार नाही, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर केला. केंद्रात आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून आमची युती घट्ट झाल्याने, कोणी पंगा घेऊ नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.