उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राजकीय भूकंप होऊ लागले आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्री आणि पाच आमदारांनी पदाचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे यातले बहुतेक मंत्री आणि आमदार ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. यातले बहुतेकजण समाजवादी पक्षात गेले असून याचा भाजपाला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. आज सकाळी मुकेश वर्मा यांनी देखील भाजपा सोडून सपाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.
एका रात्रीत सूत्रं फिरली!
धरमसिंह सैनी यांनी दुपारी आपण भाजपा सोडत असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे कालपर्यंत सैनी आपण भाजपा सोडणार नसल्याचं ठामपणे सांगत होते. स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिलेल्या यादीमध्ये आपलं नाव चुकून समाविष्ट करण्यात आलं असून आपण भाजपामध्येच होतो आणि राहणार, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. पण आज अचानक सूत्र फिरली आणि सैनी यांनी भाजपाला रामराम ठोकत सपामध्ये प्रवेश केला.
सैनींचं राजीनामापत्र व्हायरल!
सैनी यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचं पत्र व्हायरल होत आहे. “ज्या अपेक्षा ठेवून दलितांनी, मागासवर्गाने, शेतकऱ्यांनी, सुशिक्षितांनी, छोट्या-मध्यम व्यापाऱ्यांनी भाजपाला बहुमत दिलं होतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मी राजीनामा देत आहे”, असं सैनींनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सैनी यांनी गंभीर इशारा दिला आहे. “गेल्या ५ वर्षांपासून दलित, मागास वर्गाचा आवाज दाबला गेला आहे. स्वामी प्रसाद मौर्य जे म्हणतील ते आम्ही करू. येत्या २० जानेवारीपर्यंत एक मंत्री आणि तीन ते चार आमदार दररोज राजीनामा देतील”, असं सैनी म्हणाले आहेत.
योगींच्या अडचणी वाढल्या
दरम्यान, एकामागून एक मंत्री राजीनामा देत असताना त्यांच्यासोबत आमदार देखील पक्ष सोडून जात असल्यामुळे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वगुणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.