काँग्रेसचे राज्यसभेवरील खासदार धीरज साहू यांच्याविरोधातलं प्राप्तीकर विभागाचं धाडसत्र पाच दिवस चाललं. ओडिशा आणि झारखंडमध्ये प्राप्तीकर विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल ३५० कोटींहून अधिक रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. धीरज साहू यांच्या कंपनीशी संबंधित काही मालमत्ता आणि त्यांच्या निवासस्थानी टाकलेल्या धाडींमधून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या छापेमारीत ताब्यात घेण्यात आलेल्या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजायला प्राप्तीकर विभागाच्या पथकाला तब्बल पाच दिवस लागले. त्यांच्या घरात इतक्या नोटा होत्या की हे पैसे मोजण्यासाठी आणलेल्या मशीन्सही बंद पडल्या होत्या.

धीरज साहू यांच्या घर आणि कार्यालयातून ३५० कोटींहून अधिक रोख रक्कम सापडली असताना त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या काही जुन्या पोस्ट व्हायरल होत आहेत. साहू यांनी नोटबंदीच्या काळात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली होती. ही जुनी पोस्ट रिपोस्ट करत भाजपा नेत्यांनी साहू यांच्यासह काँग्रेसवर टीका केली आहे.

साहू यांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या जुन्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, “नोटबंदी करूनही देशात इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा पाहून मन खूप व्यथित झालं आहे. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा कसा जमवतात हेच मला कळत नाही. केवळ काँग्रेस पक्षच या देशातला भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करू शकतो.” साहू यांच्या या जुन्या पोस्टचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. प्रामुख्याने भाजपा नेते या पोस्ट शेअर करत साहू यांच्यासह काँग्रेसवर टीका करत आहेत.

नोटबंदीविरोधातही साहू अनेकदा आक्रमक झाले होते. त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टदेखील व्हायरल होत आहेत. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं नोटबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. नोटबंदीने या निर्णयामागचं एकही उद्दीष्ट साध्य झालं नाही. परंतु, या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे.

हे ही वाचा >> प्राप्तिकर विभागाला सापडलं ३५० कोटींचं घबाड; नोटा मोजायलाच पाच दिवस लागले! ओडिशातील ‘नोटमोजणी’ अखेर संपली

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी धीरज साहू यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्स एक्सवर शेअर करत म्हटलं आहे, आता आम्हाला समजलं की, धीरज साहू आणि काँग्रेस नोटबंदीचा इतका विरोध का करत होते. पूनावाला यांनी पुढे म्हटलं आहे, भ्रष्टाचाराच्या दुकानात बेईमानीचं सामान.

Story img Loader