बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज सध्या देशपातळीवर चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र कृष्ण महाराज यांना चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर धीरेंद्र महाराज यांनीही बागेश्वर धाम मठामध्ये काही प्रात्याक्षिक दाखवून चमत्कार सिद्ध केल्याचा दावा केला. यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे माईंड रीडर सुहानी शाह यांचेही काही व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. सुहानी शाह यांनीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याप्रमाणेच कोणताही प्रश्न वगैरे न विचारताच त्यावरचं उत्तर आधीच लिहून ठेवण्याचं प्रात्याक्षिक एका वृत्तवाहिनीवर करून दाखवलं.
सुहानी शाह यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि सुहानी शाह करत असलेल्या गोष्टींची तुलना केली जात आहे. मात्र, सुहानी शाह यांच्यापेक्षा आपण वेगळे असल्याचा दावा धीरेंद्र महाराज यांनी केला आहे.
धीरेंद्र शास्त्री महाराजांमुळे चर्चेत आलेली सुहानी शाह कोण आहे? अनेक सेलिब्रिटीही करतात फॉलो
नेमकं काय घडतंय?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज लोकांच्या मनातल्या गोष्टी ओळखत असल्याचा दावा केला जातो. त्यानुसार त्यांचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, अंनिसनं त्यांच्यावर लोकांना फसवत असल्याचा दावा केल्यापासून ते चर्चेत आले आहेत. एकीकडे हा सगळा वाद सुरू असताना दुसरीकडे सुहानी शाह यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याप्रमाणेच एका वृत्तवाहिनीवर काही प्रात्याक्षिकं दाखवून आपणही या गोष्टी करू शकत असल्याचा दावा केला. एबीपी न्यूजवर त्यांनी दाखवलेल्या या प्रात्याक्षिकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
…तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी
मात्र, सुहानी शाह आणि आपण करत असलेल्या गोष्टी भिन्न असल्याचं धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे. ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराजांची ‘चमत्कारिक चिठ्ठी’ आहे तरी काय? माईंड रीडरचा थक्क करणारा Video होतोय Viral
काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज?
“सुहानीला हे सगळं करण्यासाठी विचार करावा लागतो. तिनं सांगितलं की डोळे बंद करा. मनातल्या मनात जोरात त्या व्यक्तीचं नाव घ्या. त्यासाठी तिला तीन संकेत हवेत. माईंड रीडरसाठी या गोष्टी हव्या आहेत.पण आम्हाला तर ही कुठली गोष्ट नकोच आहे. आम्ही म्हणतो की आम्ही आधीच कागदावर एक माहिती लिहून ठेवतो. तुम्ही हव्या त्या व्यक्तीला घेऊन या. ती माहिती त्याच व्यक्तीची असेल”, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद हळूहळू अंनिस विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज असा न राहाता सुहानी शाह विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज असा होऊ लागल्याचं दिसत आहे.